फलटण : विविध साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील नवोदित साहित्यिक, लेखक, कवि यांना एक हक्काचे व्यासपीठ असावे या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेची फलटण शाखा गेली 28 वर्षे कार्यरत आहे. त्या माध्यमातून साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक परंपरा उज्वल करण्याचे काम शाखेच्या माध्यमातून केले जात आहे. साहित्य चळवळ लोकाभिमुख व्हावी व आपल्या शाखेचा कार्यविस्तार व्हावा यासाठी नूतन पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी फलटण शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी केले. दरम्यान, सभेप्रसंगी शाखेच्या अध्यक्षपदी प्राचार्य शांताराम आवटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या फलटण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेमध्ये पार पडली. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले होते. यावेळी सन 2019-20 ते सन 2021 – 22 या कालावधीकरीता नूतन कार्यकारी मंडळ व पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये प्राचार्य शांताराम आवटे (अध्यक्ष), प्रा.रवींद्र कोकरे, डॉ.सौ.माधुरी दाणी (उपाध्यक्ष). महादेव गुंजवटे (कार्याध्यक्ष), ताराचंद आवळे, अमर शेंडे (कार्यवाह), सौ.अलका बेडकिहाळ (कोषाध्यक्ष) यांच्यासह कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून सुभाष देशपांडे, प्रा.शरद इनामदार, प्रा.डॉ.अशोक शिंदे, कानिफनाथ ननावरे, मनिष निंबाळकर, सौ.हेमलता गुंजवटे, सौ.स्नेहल तगारे, सौ.स्वाती फुले यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य रविंद्र येवले म्हणाले, साहित्य परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या साहित्य विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यकाळात केला आहे. परिषद व विद्यार्थी यांचे नाते अतूट रहावे यासाठी सर्व शाळा साहित्य परिषदेची जोडल्या जाव्यात यासाठी शाळांना सन्माननीय सभासदत्व देवून शाळांमधून विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा प्राचार्य येवले यांनी व्यक्त केली.
नूतन अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे म्हणाले, साहित्य परिषदेच्या फलटण शाखेच्या माध्यमातून साहित्य चळवळ अधिक वृद्धींगत व गतिमान होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांसाठी देखील नवनवीन उपक्रम राबवून आदर्शवत काम करु, असेही आवटे यांनी सांगितले.
प्रा.रविंद्र कोकरे म्हणाले, साहित्य परिषदेच्या या मंदिरात आपण प्रबोधनाच्या माध्यमातून शारदेची सेवा करीत आहोत. यापुढेही ही सेवा अखंड सुरु राहील. रविंद्र बेडकिहाळ यांच्या कल्पनेतून बांधापर्यंत पोहचलेले साहित्य अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी शाखेच्या माध्यमातून कार्य केले जाईल.
ताराचंद्र आवळे यांनी यंदाच्या वर्षी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी प्रास्ताविक व विषय पत्रिकेचे वाचन अमर शेंडे यांनी केले. आभार प्राचार्य शांताराम आवटे यांनी मानले.
सभेत श्रीमती जयश्री जोशी, व्यंकटेश देशपांडे, डॉ.संजय दीक्षित, दत्तात्रय पतंगे, सौ.विजया सुरवसे, अरुण पंचवाघ, प्रमोद गोळे, प्रसन्न रुद्रभटे, अशोक सस्ते, संजय चोरमले, धर्मराज माने, किशोर पवार, बाळासाहेब भोसले, सौ.दिपाली निंबाळकर, निलीमा मगदुम, सौ.विजया भोसले, सौ.शमिमबानू शेख यांच्यासह सभासद उपस्थित होते.