फलटण दि. 27 : आपण माढा मतदारसंघात भाजपचे खासदार झाल्यानंतर विकासकामांचा टेलर दाखविला असून पूर्ण पिक्चर पुढे आहे. महायुतीतील ज्या पक्षाला तिकीट मिळेल त्या उमेदवाराचा प्रचार आपणास करावा लागणार आहे. दिगंबर आगवणे यांना तिकीट मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण येथे शुभारंभ लॉन्स येथे स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे, नगरसेवक सचिन अहिवळे अरुण खरात, रासपचे तालुकाध्यक्ष खंडेराव सरळ, सातारा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य काशिनाथ शेवते, सिराज शेख, बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, ॲड साहेबराव जाधव, बाळासाहेब ननावरे, अभिजीत नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजप-शिवसेना रासप रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटण कोरेगाव मतदारसंघ कोणाला सुटणार ही चर्चा वरीष्ठ पातळीवर होईल मात्र आपणास फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवावयाचे आहे यासाठी आपण सर्वांनी तयार रहावे. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागून विरोधक यांना कामाला लावावे यासाठी सज्ज रहावे असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
आपण खासदार झाल्यापासून विकास कामांना सुरुवात केलेली असून अजून बरीच विकासकामे करावयाची आहेत. महायुतीतील कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी त्याचा प्रचार आपल्याला करावा लागणार आहे. दिगंबर आगवणे यांच्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे खा. रणजितसिंह यांनी सांगितले.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथील विकासकामांची एक्स्प्रेस सुरु झाली असून आगामी काळात ती सुसाट धावणार आहे. आपण 12 दिवसात पाणी मिळवून दिले, 40 दिवसात रेल्वे प्रश्न सोडविला असून आता विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील सत्ताधारी यांना घरी बसवण्याचे काम आपल्याला करावे लागणार असून फलटण कोरेगाव मतदारसंघातील जनतेने दिलेली साथ आपण कदापिही विसरणार नाही. फलटण तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी साथ द्यावी असे सांगून राजेगट मुक्त फलटण तालुका केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही यासाठी आपणा सर्वांची साथ अपेक्षित असल्याचे आवाहन स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी केले.
फलटण कोरेगाव मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर घेतील असे सांगून मात्र फलटण तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी कार्यकर्ते यांनी तन मन धनाने काम करावे. आपण जे काही आहे ते फक्त आणि फक्त जनतेसाठी आणि जनतेसाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले.
मेळाव्यास फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.