सासकल दि. २८ : सासकल ता. फलटण गावचे हद्दीतील धुमाळवाडी गावातुन सासकलला येणार्या ओढ्यातील वाळू उपसा वाळू माफिया यांच्यामार्फत सुरु असून वाळू उपसा त्वरित बंद न केलेस ग्रामस्थ यांच्यावतीने आंदोलन करणेत येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आली आहे.
फलटण तालुक्यात गेल्या आठवडय़ात रात्री झालेल्या पावसामुळे ओढ्याला पुर आला होता. पुराचे पाणी ओसरते ना ओसरते तोच परिसरातील व बाहेरील वाळू माफीयांनी वाळू उपसा सुरू केला आहे. सासकल ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत अन्यथा प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अनाधिकृत वाळू उपसामुळे मागासवर्गीय निधीतून सासकल धुमाळवाडी ओढ्यावर बांधण्यात आलेला साकव पूल यावर्षी झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेला आहे . गेली अनेक वर्षे सासकल ता. फलटण गावच्या या ओढयात अनाधिकृत वाळूचा उपसा सुरू आहे. त्यामुळे ओढ्याचे मूळचे पात्र बदलले आहे. ओढ्याच्या काठावरील लोकांच्या शेतजमीन वाहून गेल्या आहेत. काही वाळू माफिया हे रात्री बे रात्री अविरत वाळू उपसा करीत आहेत.त्यांना प्रशासनाचा कोणताही धाक राहीलेला नाही. वाळू माफिया शेतकर्यांना धमकावत आहेत. दि. 26 सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या साकव पुलाच्या लगतच्या परिसरात दिवसा ढवळ्या राजरोस वाळू उपसा सुरू असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता पथक पाठवितो असे सांगून याठिकाणी कोणी ही प्रशासकीय अधिकारी फिरकले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महसुल विभागातील कर्मचारी तलाठी पाऊस झाल्याने पीक पाणी करण्यात व्यस्त असल्याचे ग्रामस्थ यांना सांगून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रार करणार्या ग्रामस्थांना वाळू माफिया धमकावत असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सातारा जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनावर सासकल गावातील ग्रामस्थांच्या सह्य़ा असून निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी फलटण , तहसीलदार फलटण व गटविकास अधिकारी फलटण यांना पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी सातारा यांनी सासकल ओढ्यातील वाळूचे यापूर्वी टेंडर काढून नीरा येथील ठेकेदारामाफत वाळू उपसा सुरु केला होता. सदरचा ठेकेदार याने शासकीय नियमानुसार वाळू न काढता जेसीबी व पोकलँड मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू केला होता. मात्र जास्त प्रमाणात वाळू काढली गेल्याने ओढ्याकाठचे पात्र बदलले आहे. शेतकरी यांच्या शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे. शेजारच्या शेतकरी यांनी ठेकेदार यांना विनंती करुनही ठेकेदार याने त्याच्या विनंतीला न जुमानता वाळू उपसा सुरु ठेवला होता. सासकल गाव परिसरातील वाळू उपसा करु नये असा ठराव ग्रामस्थ यांनी केला आहे. यामुळे ग्रामस्थ यांनी तहसिलदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर तहसीलदार व अन्य अधिकारी यांनी दि. १४ सप्टेंबर रोजी सासकल ओढ्याची पाहणी करून ठेकेदार याचा सदरचा लिलाव रद्द केला होता तथापी त्यानंतर गावातील ३ जण व अन्य १ बाहेरगावच्या माणसाने पुन्हा येथे वाळू उपसा सूरु केला असल्याचे ग्रामस्थ यांनी सांगितले.