फलटण दि. 28 : सळसळणारी तरुणाई, विविध वाद्यांचा गजर, ढोलकीचे तोडे व प्रसंगानुरूप कलाकार यांनी केलेली वेशभूषा आणि रंगमंचावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व रचना आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सादर केलेल्या वेगवान नृत्याविष्कारामुळे शिवाजी विद्यापीठाच्या 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये लोककला 9 व लोकनृत्याचे 9 संघांनी मुधोजी महाविद्यालयाचे रंगमंचावर केलेल्या सादरीकरणामुळे फलटणकर रसिकांनी कलाकारांना उस्फूर्तपणे साथ देऊन प्रसंगी ठेका धरला. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सादर करण्यात आलेले कलाप्रकार म्हणजे एकप्रकारे हा सांस्कृतिक दरबारच होता.
मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या दुसर्या दिवशी लोककला प्रकारात देवीच्या संदर्भातील व वाघ्या-मुरळी अशी 5 नृत्यप्रकार आणि मंगळागौर, डोंबारी, मोहरमचा दरबार भारतीय समूह लोकगीत हे कलाप्रकार सादर करण्यात आले. देवीच्या गाण्यांमध्ये कलाकारांनी प्रसंगानुरूप हिरवा, पिवळा, तांबडा रंग पेहरावासाठी निवडला होता. कलाकार यांनी गळ्यात कवड्यांच्या माळा, डोक्याला मुंडासे व चवंडक आणि संबळाच्या तालावर विविध गीते सादर केली. चवंडकाच्या आवाजावर प्रेक्षकांनी ताल धरला. हिंदू-मुस्लिम संस्कृती ऐक्य दाखविणारा मोहरमचा दरबार आणि युवती यांनी सादर केलेली मंगळागौर प्रेक्षकांना खूपच आवडली. आगळे वेगळे डोंबारी नृत्य सादर करताना युवा व युवती कलाकारांनी सर्व कलाप्रकार व नृत्यामधील कसरती ताकदीने सादर केल्याने प्रेक्षक यांनी सर्व कलाप्रकाराला टाळ्या वाजून दाद दिली.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालय येथे 39 युवा महोत्सवातील लोकनृत्य व लोककला विविध कलाप्रकार यामध्ये सर्वांनी आपापल्या परीने झोकून देवून कला सादर केल्याने रंगत वाढली. लोकनृत्याचे माध्यमातून विविधतेतून एकता दाखवण्याचा प्रयत्न झाला. सादर करण्यात आलेल्या 9 लोकनृत्यामध्ये गुजराती डांगी नृत्य 2, गोव्यातील दिपल्यान नृत्य 2, महाराष्ट्रातील दिंडी प्रकार 2 व 1 आदिवासी नृत्याचा समावेश होता. यावेळी विविध गीते सादर करताना रसिकांना ढोलकीच्या तोड्यावरील नृत्य, बासरीची सुंदर धून माठ वापरून केलेला ध्वनी, नादस्वरमंच्या साह्यायाने करकट्टम नृत्य, तारपा नृत्याचेवेळी वापरलेले आरणा वाद्य व त्याची धून, दिंडी नृत्यातील रिंगण, दिपल्यान नृत्यामधील समई नृत्य या सर्व नृत्यांमध्ये करकट्टम नृत्याचे सादरीकरण वेशभूषा आणि विविध प्रात्यक्षिकाद्वारे सादर केलेले नृत्य सर्वांना खूपच भावले. उत्कृष्ट वाद्यमेळ यामुळे दोन्ही कलाप्रकारांचे सादरीकरणाचा आस्वाद रसिकांनी भरभरून घेतला. प्रसंगानुरूप ध्वनी आणि प्रकाश योजना यांचीही साथ उत्तमप्रकारे मिळाली. जवळजवळ अडीच तास या कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले तर वरूण राजानेही तरुणाईला मुक्त वातावरणात कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.