फलटण दि. २५ : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण या संस्थेने दूध उत्पादक शेतकरी यांना समोर ठेऊन कमी खर्चात अधिक दुग्धोत्पादनाद्वारे दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यातून उभा राहिलेला शेतकरी ही संकल्पना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल यांनी केले आहे.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण या संस्थेची संकल्पना प्रेरणादायी : ना. पाशा पटेल
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण यांनी निर्माण केलेली मुक्तसंचार गोठा पद्धती, मुरघास, हायड्रोपोनिक चारा उत्पादन, मोड आलेल्या धान्याचा दुभत्या जनावरांच्या आहारात वापर, वासरे संगोपन, उच्च वंशावळीच्या विदेशी विर्यमात्रा, आहार संतुलन, सेंद्रिय दूध उत्पादन, अझोला उत्पादन, जनावरांच्या आजारात झाडपाल्याचे उपचार वगैरे विविध उपक्रमाची माहिती घेण्यासाठी ना. पाशा पटेल यांनी गोविंदला पूर्व कल्पना देऊन भेटीचे नियोजन केले होते, मात्र येथे पोहोचण्यास उशीर झाल्याने त्यांनी निंबळक येथील मुक्तसंचार गोठ्याची पाहणी करुन माहिती घेतली. मुक्तसंचार गोठा ही अभिनव संकल्पना असून यामध्ये जनावरांचे आजार कमी होतात, प्रति जनावर खर्च कमी होतो मात्र दुग्ध उत्पादन वाढते, चांगल्या प्रतीचे शेणखत उपलब्ध होते, चांगल्या गुणवत्तेचे दूध मिळत असल्याने त्याचा दर अधिक असतो, शिवाय प्रति जनावर दुग्धोत्पादन वाढत असल्याने उत्पन्नात भरीव वाढ होत असल्याचे स्पष्ट करतानाच ही संकल्पना विदर्भात राबविण्याचा निर्धार व्यक्त करीत त्यासाठी गोविंदच्या सहकार्याची अपेक्षा कृषी मूल्य आयोगाचे ना. पाशा पटेल यांनी व्यक्त केली.
दुष्काळी पट्ट्यातील शेतीला जोड धंदा म्हणून गोपालनची निवड करताना कमी खर्चात अधिक उत्पादन ही संकल्पना महत्वाची असल्यानेच गोविंदला गेली २५ वर्षे आपली वाटचाल यशस्वितेच्या मार्गावरुन सुरु ठेवताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचीही आर्थिक प्रगती साधणे शक्य झाल्याचे स्पष्ट करीत विदर्भातच नव्हे संपूर्ण देशभर मुक्तसंचार गोठ्याची ही संकल्पना आणि दुग्ध व्यवसायाच्या हिताच्या योजना गोविंदच्या माध्यमातून राबविण्याचे ना. पाशा पटेल सांगितले.
गोविंद डेअरी आणि डेअरीशी संबंधीत पशू पालक शेतकर्यांच्यावतीने हिरालाल सस्ते आणि गोविंदचे उप महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी ना. पाशा पटेल याचे यथोचित स्वागत व सत्कार केला. यावेळी दूध उत्पादक शेतकरी आणि गोविंद दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी, निंबळक ग्रामस्थ उपस्थित होते.