फलटण : स्वीडिश आंदोलन करता ग्रेटा थुनबर्ग हिने जगभरातल्या मुलांना व प्रौढांनाही केलेल्या आवाहनाला शुक्रवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी रॅलीच्या स्वरुपात पाठिंबा दिला.
‘सेव्ह अर्थ सेव्ह फ्युचर, ‘आता विनाश दूर नाही, अशा घोषणांचे रंगीबेरंगी व कल्पकता वापरून केलेले फलक धरून इ. ५ व इ.१० चे सुमारे २०० विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पर्यावरण वाचवण्यासाठीच्या उत्स्फूर्त घोषणा देत या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, महाविर स्तंभ चौक, डेक्कन चौक अशी फेरी काढली. १० च्या विद्यार्थ्यांनी चौकाचौकात पथनृत्य सादर केले.
मानवी हस्तक्षेपामुळे आज पर्यावरणाचे ज्या वेगाने नुकसान होत आहे तो वेग तसाच राहिला तर मुलांचे भव्य भविष्य अंधकारमय असेल याकडे जगभरातील नेत्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या वर्षभरात वर्षापासून ग्रेटा थुनबर्ग ही स्वीडिश शाळकरी मुलगी आंदोलन करीत आहे. पर्यावरणाच्या मुद्द्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याबद्दल जागतिक पातळीवर तातडीने पावले उचलली जावीत अशी तिची मागणी आहे. २३ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभा राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे निमित्त साधून २० ते २७ सप्टेंबर हा हवामान आठवडा म्हणून साजरा होणार आहे.