फलटण, दि. 23 : फलटण तालुक्यातील विविध भागात हजेरी लावणारा परतीचा पाऊस सप्टेबर अखेर आली तरीही अद्याप झाला नसल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस नसल्याने 2 गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स आणि जनावरांच्या 4 छावण्या सुरु असून त्यामध्ये सुमारे 2300 लहान मोठी जनावरे दाखल आहेत.
फलटण हा रब्बीचा तालुका असून पाऊसाची सरासरी 350/400 मि.मी. इतकी आहे. यावर्षी तालुक्यात आतापर्यंत 200 मि.मी. पाऊस झाला आहे. परतीच्या पाऊसावर येथील रब्बीची पीके, जनावरांचा चारा आणि जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागते मात्र यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने चारा, पिण्याचे पाणी याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पाऊस व पेरण्या झाल्या नसल्याने शेतमजूरांना काम नाही. शेतकरी हवालदिल होवून परतीचा पाऊस कधी पडतो याची वाट पहात आहे.
तालुक्याच्या बाहेर झालेल्या पावसाने नीरा नदीला प्रचंड पूर आला त्यामध्ये फलटण तालुक्यातील 315 हेक्टर क्षेत्रावरील पीके, फळबागा काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या व अनेकांची घरे पडली आहेत.
फलटण तालुक्यातील 127 गावापैकी 35/40 गावे बागायती आणि उर्वरित जिरायत पट्यात मोडतात. सुमारे 2 महिन्यापासून नीरा उजवा कालवा पूर्ण क्षमतेने भरुन वाहतो आहे मात्र नीरानदीच्या पूराने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरला नाही. ऊसाच्या लागणींना म्हणावी अशी गती आलेली नाही तर जिरायती पट्टयात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
फलटण तालुक्यात जावली, वडले, मिरढे आणि दुधेबावी या 4 ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरु आहेत. नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून जावली येथे सुरु करण्यात आलेल्या जनावरांच्या छावणीत 95 लहान, 837 मोठी अशी एकुण 932 जनावरे दाखल आहेत, वडले येथे गणेश मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या छावणीत 47 लहान, 268 मोठी अशी एकुण 415 जनावरे दाखल आहेत. मिरढे येथे मनोधैर्य मानसशास्त्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था दालवडीच्यावतीने सुरु असलेल्या छावणीत 51 लहान 411 मोठी अशी एकुण 462 जनावरे दाखल आहेत. दुधेबावी येथे माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या छावणीत 35 लहान, 439 मोठी अशी एकुण 474 जनावरे दाखल आहेत.
फलटण तालुक्यातील आदर्की ते आंदरुड या दुष्काळी भागातील परिस्थिती भयंकर असून परतीचा पाऊस वेळेवर झाला नाही तर जनावरे व जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असून जनावरे यांच्या चार्याचा प्रश्न जटील होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.