फलटण : शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी इटली येथे पार पडलेल्या “IRONMAN” १४०.६ ह्या स्पर्धेत येथील नामांकित स्त्री रोग तज्ञ डॉ.पी.बी.भोईटे यांचे चिरंजीव रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रणिल प्रभाकर भोईटे यांनी यश संपादन केले आहे.
इटली येथील स्पर्धेचे मूळ स्वरुप म्हणजे एकावेळी ३ क्रिडाप्रकार पूर्ण करावे लागत असून प्रथम ३.८ किलोमीटर पोहणे २ तास २० मिनिटामध्ये पूर्ण करावे लागते. लगेच १८० किलोमीटर सायकल चालवावी लागते वेळ ७ तास आणि ४० मिनिट तर ४२ किलोमीटरचे अंतर ६ तासात पळून पूर्ण करावे अशी ही Ironman स्पर्धा असून ती १६ तासात पूर्ण करावी लागते.
डॉ.प्रणिल भोईटे ह्यांनी इटली मध्ये पार पडलेल्या स्पर्धात निर्धारित वेळेच्या आधी १ तास १७ मिनिट म्हणजेच १४ तास आणि ४३ मिनिटामध्ये पूर्ण केली. डॉ.प्रणिल यांनी मागील वर्षी मलेशिया येथे झालेल्या “IRONMAN” ७०.३ ह्या स्पर्धेत यश संपादन केले होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून क्रिडा स्पर्धेत यश मिळवणे ही कौतुकास्पद बाब आहे.
पहिल्यापासूनच व्यायामाची आवड असणारे डॉ.प्रणिल भोईटे यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेत यश मिळविले असून”IRONMAN” स्पर्धेचा सराव ते गेल्या दीड वर्षांपासून करत आहेत. जून महिन्यात “IRONMAN” स्पर्धेचा सराव करीत असताना त्यांचा सायकलवरुन अपघात झाला होता. खांद्याला दुखापत झाली असतानाही भोईटे यांनी त्यावर मात करुन ह्या स्पर्धेत उत्तुंग यश मिळविले.
डाॅ. प्रणील भोईटे यांच्या यशामध्ये आई, वडील, पत्नी आणि त्यांचे प्रशिक्षक पंकज रावळू यांचा मोलाचा वाटा त्यांनी सांगितले. फलटण शहर तालुक्यातील विविध स्तरावरून डॉ. प्रणिल भोईटे यांचे अभिनंदन होत आहे.