फलटण दि. 23 : बिबी ता. फलटण येथील गावामध्ये दारुची अवैधरीत्या विक्री करणारे चार स्थानिक ग्रामस्थ यांना ग्रामपंचायत यांच्यावतीने विनंती केल्यावर त्यांनी आता यापुढे गावात दारू विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगितलेवर त्यांचा ग्रामपंचायतचेवतीने सत्कार करण्यात आला. बिबी गाव आता यापुढे दारुमुक्त गाव म्हणून ओळखले जाणार असल्याचे ग्रामपंचायत याच्यावतीने जाहीर करण्यात आले.
फलटण तालुक्यातील पश्चिम भागात फलटण सातारा रोडपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर बिबी हे गाव असुन गावची लोकसंख्या 2500 ते 3000 चे आसपास आहे. बिबी गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैधरीत्या दारु विक्री केली जात असल्याने गावातील तरुण ग्रामस्थ व्यसनाधीन झाले होते. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी गावात दारु बंदीचा निर्णय घेतला होता.
गेल्या आठवडय़ात बिबी गावातील सुमारे 200 ग्रामस्थ व महिला यांनी गावातून प्रभात फेरी काढून दारु बंदीबाबत जनजागृती केली होती. मात्र तरीही गावात दारु विक्री केली जात असल्याने गावात दारू विक्री करणारे यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि महिला यांनी त्याबाबत अंतिम सुचना दिली होती. आज दि. 22 सप्टेंबर रोजी पुन्हा गावातील सुमारे 250 ग्रामस्थ व महिला यांनी गावातून दारुबंदीबाबत घोषणा देत प्रभातफेरी काढली त्याला गावात अवैधरीत्या दारु विक्री करणाऱ्या स्थानिक 4 व्यवसायिक यांनी गावात यापुढे दारु विकणार नसल्याचे मान्य केल्याने ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी या चौघांचा पुष्पहार श्रीफळ देवून यथोचित सन्मान केला.
बिबी गावात यापुढे अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गावात दारु बंदी करण्यासाठी सरपंच मारुती कुंभार, उपसरपंच नवनाथ बोबडे, पोलीस पाटील अजित बोबडे, तेजल बोबडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुळशीदास बोबडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व युवक व महिला यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल सव स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्की बुद्रुक पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.