फलटण : विडणी ता. फलटण येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पूर्णवेळ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी बचाव कृती समिती पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने आज ( शुक्रवार दि.२०) रोजी शाळा बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शाळा बंद व धरणे आंदोलनास उपशिक्षणाधिकारी यांनी भेट देवून लेखी आश्वासन दिल्यानंतर शाळा बंद व धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी ता फलटण येथे असून विद्यालयाची स्थापना1972 साली करण्यात आली आहे. शाळेतून हजारो विद्यार्थांनी शिक्षण घेऊन आपले भविष्य घडविले आहे. विडणी गावात उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही खासगी शिक्षण संस्था कार्यरत आहे.
शाळेत सध्या इ. 5 ते 12 वीपर्यंत सुमारे ६५० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्यासाठी १९ शिक्षक आहेत परंतू वयोमर्यादानुसार ९ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याजागी संस्थेने तात्पुरत्या स्वरुपात रिक्त शिक्षकांची पदे भरली असून त्यांची नेमणूक करून जवळपास ५ वर्ष होऊन गेली असून त्यांना शासनमान्य नेमणूकीचे पत्र अद्याप मिळाले नसल्याने व त्यांना बिनपगारीच काम करावे लागत असल्याने ते विद्यार्थ्याना पूर्णवेळ शिकवित नाहीत. शिक्षक आपल्या सोईनुसार शाळेत येऊन शिकवत असतात त्यामूळे शाळेतील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने विद्यार्थी यांनी पालकांकडे तक्रार केल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाकडे पालक यांनी चौकशी केली. व्यवस्थापनाने मात्र पालक यांना खोटे सांगून पालकांची दिशाभूल गेली अनेक महिने चालविली होती.
पालकांची दिशाभूल होत असल्याने पालक यांनी व ग्रामस्थांनी संस्थेच्या गैरकारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत शुकवारी सकाळी 9 वाजता उत्तरेश्वर हायस्कूलसमोर ग्रामस्थ व पालक यांच्यावतीने शाळा बंद व धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. उत्तरेश्वर हायस्कूल गेटसमोर सुमारे 550 हून अधिक संख्येने पालक व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.
विद्यार्थी बचाव कृती समिती पालक यांनी आमचे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व इमारतीमध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जिल्हा परिषद माध्यमिक विभाग सातारा उपशिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, फलटण पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणधीकारी रमेश गंबरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पालक व ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या ऐकून घेऊन संस्थेची शाळा कमिटी व बिनपगारी शिक्षक , मुख्यध्यापक यांच्यासोबत चर्चा करुन शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दर्जा कायम राखण्यासाठी आम्ही वेळोवेळी शाळेस भेटी देऊन तसा अहवाल तयार केला जाईल असे सांगितले.
शाळेत कायमस्वरुपी शिक्षक उपस्थित राहून मुलांना चांगल्याप्रकारे शिक्षण देण्यासाठी काम करतील असे लेखी हमी पञ आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेचे सांगण्यात आले.
संस्थेच्या कामकाजाची सखोल चौकशी करुन दोषींवर व संबंधित यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगून आंदोलन मागे घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलिस पाटील धनाजी नेरकर यांनी आजचे आंदोलन शांतपणे पार पाडून आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याने आंदोलन यशस्वी झाले असल्याचे सांगून सर्वाचे आभार मानले.
दरम्यान शाळा बंद व धरणे आंदोलनावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.