झिरपवाडी येथे शासनाच्या विविध योजनांमधून गत दोन वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

फलटण : झिरपवाडी गावच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा ओढा जोडा प्रकल्प गिरवी, बोडकेवाडी, निरगुडीमधून वाहणारा ओढा निरगुडी – विंचुर्णीच्या शिवेवरुन जोडला जाणार आहे. या ओढा – जोड प्रकल्पाची मोजणी झाली असून इस्टीमेटही काढण्यात आले आहे. या ओढा – जोड प्रकल्पामध्ये आपण जातीने लक्ष घालून हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्‍वासन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिले. 
झिरपवाडी (ता.फलटण) येथे शासनाच्या विविध योजनांमधून गत दोन वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या विकासकामांमध्ये प्रामुख्याने स्मशानभूमी शेड, डांबरीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर व पाईप लाईन, पाणंद रस्ते, बंदिस्त गटारे, ई-लर्निंग सुविधा आदी कामांचा समावेश होता. तसेच यावेळी आमदार चव्हाण यांच्या हस्ते महादेव मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजनही संपन्न झाले. कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, झिरपवाडीचे माजी सरपंच महादेव गुंजवटे, सरपंच सचिन गुंजवटे, सोनवडीचे माजी सरपंच धनंजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना महादेव गुंजवटे म्हणाले, झिरपवाडी ग्रामपंचायतीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिन रणवरे, एच.डी.एफ.सी. बँकेचे सर्व अधिकारी, अफॉर्म संस्था पुणेचे भोजराज शेंडे, समन्वयक जयदिप जगताप, प्रोजेक्ट मॅनेजर संतोष पवार, कृषी अधिकारी आदी पदाधिकार्‍यांच्या सहकार्यामुळेच झिरपवाडी येथे ऐतिहासिक भौतिक सुविधांची कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. इथून पुढील काळातही राजे गटाच्या माध्यमातून गावाची विकासाकडे वाटचाल सुरु राहणार आहेत.
यावेळी महादेव गुंजवटे यांच्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत (सन 2017-19) झालेल्या विकासकामांची सचित्र माहिती देणार्‍या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते झाले. इयत्ता 10 वी, 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. जयभवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी  नियुक्ती झाल्याबद्दल झिरपवाडी गावचे सुपुत्र अशोक गुंजवटे यांचा, सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सचिन गुंजवटे यांचा, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गोडसे व अफार्म संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमास झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काकडे, अमोल इंगळे, प्राचार्य अशोक गुंजवटे, शंकर गुंजवटे, बापुराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!