बिबी : फलटण तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई असताना ढवळ गावाला पाण्याची टंचाई भासत नाही. येथील शेतक-यांनी काळाच्या ओघात शेती पिकाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असून गावात आल्यावर शेतात डोलणारी पिके व परिसरातील पाणी पाहून समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले. ढवळ ता.फलटण येथे एच.डी.एफ.सी. बैंक व अफार्म संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत येथील बांधा-याचा जलपूजन समारंभ तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी फलटण तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, सरपंच सौ.उषाताई लोखंडे, माजी सरपंच विष्णू लोखंडे, अफार्मचे विस्तारअधिकारी संतोष पवार, जयदिप जगताप यांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे व शासनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून शेतातील पिकांना नियोजनबद्ध पाणी दिल्यास व योग्य पिके घेतली तर उत्पादन वाढेल अशी अपेक्षा हनुमंत पाटील यांनी व्यक्त केली.
कृषी खात्यांर्गत शासन शेतक-यांच्यासाठी विविध योजना राबवित असून योजनांद्वारे फळबाग लागवड करुन शेतक-यांनी आपली उन्नती साधावी. पारंपारीक पिकापेक्षा फळबाग योजनेचा, शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, ठिबक सिंचनसारख्या योजनांचा फायदा घेवून पाणी बचत करुन जास्तीत जास्त उत्पादन वाढवून शेतक-यांनी आपले जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डोईफडे यांनी केले.
सन २०१८-२०१९ यावर्षामध्ये एच.डी.एफ.सी.बैंक व अफार्म संस्था पुणे यांचे वतीने ढवळ गावामध्ये शाळेतील जमिनीखाली भूमिगत पाण्याची टाकी, शाळेतील वर्ग दुरुस्ती व शाळेची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रंथालयाची सोय, आरोग्य कँम्प व जनजागृती कार्यक्रम, व्यसनापासून लोकांना परावृत्त करणेसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम, नैसर्गिक साधनसंपत्ती उपक्रमांतर्गत शेतक-यांच्यासाठी कांदा पिक प्रात्यक्षिके व शेतीशाळा, शेतकरी बचतगटांना ठिबक सिंचन सेट, उपजिविका व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २ भेंडी उत्पादक बचतगट व २ पशुपालक उत्पादन गट तयार करुन व्यवस्थापन व आर्थिक समायोजन याबाबतचे प्रशिक्षिणामार्फत मार्गदर्शन करुन सबलीकरण केले. याशिवाय जुना सिंमेंट नाला बांध यातील गाळ काढून खोलीकरण रुंदीकरण करुण दुरुस्ती करण्यात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण केलेल्या बंधा-यातील पाण्याचे पूजन आज होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रारंभी ढवळ गावच्या सरपंच सौ उषाताई लोखंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संजय लोखंडे, शुभम गारडे, बाळू शिंदे, सुजीत राक्षे, संजय गारडे, राहुल गिरमे, अजित तांबे, मिथुन लोखंडे, प्रकाश तांबे यांचेसह शेतकरी बचतगट, पशुपालक गटातील महिला बचतगट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक विशाल येवले यांनी केले तर शेवटी भोजराज शेंडे यांनी आभार मानले.