फलटण दि. 16 : आदर्की बुद्रुक ता फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून आर्थिक मदत जमा करुन शाळेत सुरू केलेला डिजीटल क्लासरुम मधील साहित्य लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाला.
कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सौ प्रतिभा धुमाळ श्री भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब कासार विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव सौ. राजश्री धुमाळ केंद्रप्रमुख शिंदे मुख्याध्यापिका व शिक्षिका उपस्थित होते.
आदर्की बुद्रुक ता फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ६७ वर्षं पूर्ण होत असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १०२ विद्यार्थी व ४ शिक्षक असल्याचे मुख्याध्यापिका यांनी प्रास्ताविकमध्ये सांगून ग्रामीण भागातील मुले स्पर्धेच्या युगात मागे राहू नयेत यासाठी लोकसहभागातून डिजीटल क्लासरुम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ यांना धन्यवाद दिले.
लोकवर्गणीतून मदत जमा करून संगणक, प्रिंटर, 2 स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर व स्क्रीनला लागणारे स्टॅण्ड ही मदत शाळेला उपलब्ध करून दिली आहे. शाळेतील आफीस खोलीचे सेफ्टी डोअर व खिडकी यांना संपूर्ण संरक्षण करुन देण्यात आले असून गावातील 148 ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी व अन्य यांनी मदत रोख स्वरूपात 1 लाख 15 हजार रुपये जमा करुन शैक्षणिक साहित्य खरेदी करुन डिजीटल क्लासरुम उभारण्यात आला आहे.
कै. सचिन धुमाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सागर धुमाळ यांनी 105 आफीस बाक्स फाईल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. .
यावेळी लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक डिजीटल साहित्य लोकार्पण सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी आर्थिक मदत करणारे देणगीदार व ग्रामस्थ यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.