फलटण दि 15 : भारत निवडणुक आयोगा यांच्यावतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 ची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये पूर्व तयारीचे कामकाज सुरु करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हणुमंत पाटील यांनी माहिती दिली.
निवडणुकीकरीता फलटण मतदार संघामध्ये एकूण 46 झोनल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थायी सर्व्हेक्षण – 8 टीम, भरारी पथक- 6 टीम तयार करणेत आल्या आहेत. व्हीडीओ सर्व्हेक्षण टीम – 3 पथके आणि व्हीडीओ पहाणी पथक- 1 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीची इतर कामे करण्यासाठी वेगवेगळया टीम्स नियुक्त करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ अंतर्गत एकूण 339 केंद्र असून ठाकुरकी ता फलटण येथील मतदान केंद्र क्रमांक 153 ची मतदार संख्या 1500 पेक्षा जास्त असल्यामुळे त्याठिकाणी 1 सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. फलटण शहर येथील मतदान केंद्र क्र.184 हे महिला कर्मचारी असलेले मतदान केंद्र असून 194 हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निश्चीत करण्यात आले असल्याची माहिती देेण्यात आली आहे.
255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे मतदार यादीमध्ये सद्यस्थितीत ध्वजांकीत केलेले एकुण 1730 दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचे वेळी वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रात जाणेसाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे.
भारत निवडणुक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी आगामी काळात होणा-या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 चे मतदानासाठी EVM बरोबर VVPAT हया मशीनबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणेसाठी सर्वंकष प्रसार व जनजागृती करणेसाठी मोहिम राबविणेचे आयोजन फलटण शहर व तालुक्यात करण्यात आलेले असून मतदार संघामधील एकूण 153 गावांमध्ये 221 ठिकाणी मोहिम राबविणेबाबत आदेश देण्यात आले आहेत त्यासाठी 6-6 कर्मचा-यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. VVPAT जनजागृती कार्यक्रम गावोगावी राबविणेत येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार फलटण हणुमंत पाटील यांनी दिली.