कार्यकर्ते यांना विश्वासात घेवून, तालुक्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी महामेळावा : ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण दि. १३ :  महाराष्ट्र राज्यातील मोठे राजकीय नेते भाजपा, शिवसेना या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी उत्सुक असताना ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजेगटाने आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते पक्ष बदलतील  अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी घेतल्याचे सांगून पक्ष बदलाबद्दल होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला असल्याचे आज दिसून आले. 
    महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना श्रीमंत रामराजें  नाईक निंबाळकर व राजेगटाच्यावतीने शुक्रवार दि. 13 रोजी  येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यामध्ये बोलताना ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वरील मत व्यक्त केले.  या मेळाव्यास खंडाळा, कोरेगाव,  सातारा जिल्ह्यातील  पदाधिकारी, कार्यकर्ते  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील,  आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत विश्वजितराजे  नाईक निंबाळकर पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ, फलटण नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे खंडाळा पंचायत समिती माजी सभापती रमेश धायगुडे, पाचगणी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीताई कराडकर, प्रवीण बोधे, किरण  शिंदे, लोणंद माजी सरपंच नंदाताई गायकवाड, सरपंच अजित भोईटे, जीतेंद्र जगताप, संजयबापू धुमाळ, हिंदुराव भोईटे  उपस्थित होते. 
फलटण शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे हित अपेक्षा यांच्यासाठी आपणास पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा लागला तरीही खा. शरदराव पवार यांना न दुखावता सर्वसामान्यांच्या हितासाठी  निर्णय घेण्याची ग्वाही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी देवून आपण नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि सभापती या स्थानापर्यंत पोहचलो असल्याने आता आपली कोणतीही अपेक्षा राहिली नाही. सातारा जिल्ह्याचे नुकसान आपण होवू देणार नाही. केवळ सत्तेसाठी पक्ष बदल ही संकल्पना आपल्याला मान्य नसल्याचे श्रीमंत रामराजें यांनी यावेळी सांगितले. 
राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपण सक्रिय झाल्यापासून  खा. शरदराव पवार हाच पक्ष असल्याचे सांगून त्यांच्याबद्दल आपण कधीही चुकीचे बोलणार नाही व वागणार नाही.  लोकांच्यात असलेली संभ्रमावस्था दूर करुन तरुणांना जिल्ह्याची संस्कृती, परंपरा  समजावून सांगून तरुणांना सातारा जिल्ह्याच्या विकासात सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ना. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले. 
  ज्यांना  विकास, लोकांचे प्रश्न व सामाजिक बांधीलकी माहिती नाही त्यांना रोखण्यासाठी आपण खंबीर असून राज्याचे पाणी अडविताना फलटण व  सातारा जिल्ह्याचा विचार न करता  दुष्काळी भागाला  प्राधान्य दिले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्यावर विश्वास ठेवून जमिनी दिल्या आणि प्रकल्प उभे राहिले. सातारा जिल्हा विकासाला बांधील राहिला पाहिजे, जाती पाती पलीकडे इथे सत्ता राबविली गेली पाहिजे अशी आपली धारणा असून त्यासाठी संघर्ष सुरु असून तो पुढेही सुरुच राहणार असल्याचे  ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 
   फलटण तालुका व शहरातील विविध प्रश्न यासाठी आणि येथील शेतीला पाणी, औद्योगिक विकासासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले.  येथील संस्था पुन्हा उभ्या केल्या. सत्तेच्या माध्यमातून  विकासाची धूळधाण होणार असेल तर योग्य निर्णय घ्यावा लागेल असे सांगून सातारा जिल्हा बँक, जिल्हा परिषद व इतर संस्थांच्या माध्यमातून उभी राहिलेली यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी सत्ता योग्य लोकांकडे असली पाहिजेत त्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले. 
    यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, डॉ बाळासाहेब शेंडे, सोपान जाधव, विनायकराव बेलदार पाटील, शिवाजी लंगुटे, वैभव खटके, बजरंग खटके, हिंदुराव भोईटे, सुखदेव बेलदार, कांतीलाल बेलदार, माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सौ. रेश्मा देशमुख यांची समयोचित भाषणे झाली.
         शेवटी प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी आभार मानले. कार्यक्रमास फलटण शहरात व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी , पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन  यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!