फलटण दि. १३ : फलटण शहरातील घरगुती व सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जना पूर्वी नागरिक निर्माल्यदान करुन मगच गणेशमूर्ती विसर्जित करतात ही बाब समाधानकारक असून सन्मित्र गणेशोत्सव मंडळाने सुरु केलेला उपक्रम सर्वांना स्फुर्ती देणारा असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.
येथील सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, क्रांतीसिंह नाना पाटील चौक फलटण यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेश विसर्जन दिवशी निर्माल्यदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे हस्ते गणेश पूजनाने या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, लायन्स क्लबचे भोजराज नाईक निंबाळकर, रणजित निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, विनायकराव थिटे, विक्रांत थिटे, प्रकाशराव गरुड, अभय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री गणेश विसर्जनावेळी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये प्लास्टिक हौद ठेवून आले होते. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेशास घातलेले हार, फुले, दुर्वा, हळद-कुंकू यासह पूजेचे साहित्य मूर्तीसोबत पाण्यामध्ये विसर्जित केले जात असल्याने पाणीचे प्रदूषण टाळण्यासाठी स्वच्छ भारत योजनेंतर्गत मंडळाचेवतीने
या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या गणेशमूर्ती नीरा उजवा काव्यातील पाण्यात विसर्जित केल्या जात असून गणेश विसर्जनासाठी नीरा उजवा कालव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावर असणार्या नाना पाटील चौकात सन्मित्र गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गेली ५८ वर्षापासून श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. मंडळाचे समोर प्लास्टिक हौद ठेवून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाताना निर्माल्य या प्लास्टिक हौदात टाकण्याची व्यवस्था २ वर्षांपासून करण्यात आली असून जमा झालेले निर्माल्य मालोजीराजे शेती महाविद्यालय येथे गांडूळखत निर्मितीसाठी दिले जातअसल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, सभासद कार्यकर्ते व व्यापारी हितचिंतक उपस्थित होते.