फलटण दि. १२ : महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी पूरस्थिती व दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गत महिन्यात महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, नाशिकसह राज्यातील इतर भागात पूरस्थितीने थैमान घातले होते. यामध्ये मोठया प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. अनेकांचे संसार डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले. जनावरे, माणसे मेली, हजारो एकर शेती पिकांचे नुकसान झाले. ही परिस्थिती पाहून देशाचे जाणते नेते खा. शरदचंद्रजी पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी व नव्याने संसार उभे करण्याचे आवाहन आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडे केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेती उत्पन्नाच्या तिप्पट रक्कम नुकसान भरपाईसह सर्वोतोपरी मदत जाहीर केली याबद्दल जाहीर आभार व अभिनंदन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
खा. पवार यांनी मदतीचा निर्णय घेतलेवर मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना आपल्याला दुष्काळी शेतकऱ्यांची आठवण का झाली नसावी हे विशेष आहे. कारण एकीकडे पूरस्थिती असताना राज्यातील अनेक भागात भयानक दुष्काळी स्थितीचे चित्र पहायला मिळत आहे. हे चित्र आपण विसरुन गेलात. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात शेतीचे उत्पन्न बुडीत आहे. शेतीपुरक व्यवसाय मोडकळीस आले आहेत. पाण्याचे टँकर, चारा छावण्या सुरू आहेत, लोक भर पावसाळ्यात रोजगार हमी योजना कामावर जात आहेत. त्यामुळं दुष्काळी शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी दिली गेली पाहिजे व तशी घोषणा आपण करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
आपण ३ वर्षांपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी खूपच जाचक व वेळखाऊ निघाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धड कर्जमाफीही मिळाली नाही व नवीन कर्जही मिळाले नाही. त्यामुळे आपण महाजनादेश यात्रेतून वेळात वेळ काढून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा. पूरग्रस्त शेतकऱ्यांबरोबर दुष्काळी शेतकऱ्यांना सरसकट बिनशर्त कर्जमाफी जाहीर करून नव्याने कर्ज द्यावे. 2019 चा पावसाळा सुरू होऊन तब्बल ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून अद्याप राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नाही. कृत्रिम पावसाची योजनाही फोल ठरली आहे. बहुतांशी भागात शेतकरी यांनी शेतात पेरणीही केली नाही. जिथं पेरणी झाली आहे तिथे पिके पाऊस व पाण्याअभावी करपून गेली आहेत. सन 2018 पेक्षा सन 2019 मध्ये शेती, शेतकरी व जनावरे यांच्या बाबत भयंकर व खडतर जाणार आहे. त्यामुळे शासनाने दि. १ सप्टेंबर पासून राज्यभरात दुष्काळी सवलती लागू कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकरची संख्या वाढवावी. रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत. पूरग्रस्त भागात ओला व दुष्काळी भागात सुका दुष्काळ पडला असून त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आगामी कॅबिनेट बैठकीत राज्यात दुष्काळ जाहीर करावा. सततच्या प्राप्त परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागातील जवळपास सर्वच घटकांचे उत्पन्न व उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे बँक, सहकारी संस्था व फायनान्स यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीने लोक हैराण झाले आहेत म्हणून सरकारने ओला व सुका दुष्काळ जाहीर करावा असे मत निवेदनात शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी व्यक्त केले आहे.