फलटण दि. १२ : आदर्की बुद्रुक ता फलटण येथील गावातील दोन मोठय़ा गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्रित येवून एकीचे दर्शन घडवून श्री गणेशमूर्तींची एकत्रित मिरवणूक काढून वेगळा आदर्श घालून दिला असून येथून पुढे सार्वजनिक उत्सव व उपक्रम एकत्रित येवून साजरे करण्याचा घेतलेला निर्णय गावाच्या द्रष्टीने कौतुकास्पद आहे.
आदर्की बुद्रुक ता फलटण येथे गावामधील मठाचीआळी येथील विठ्ठल रुक्मिणी गणेशोत्सव मित्र मंडळ व धुमाळ चौकातील शिवतेज गणेशोत्सव मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद हे श्री गणेशोत्सव कालावधीमध्ये दरवर्षी आपल्या लाडक्या गणेशाची प्रतिष्ठापना करतात तशी यावर्षीही दोन्ही मित्र मंडळाचेवतीने २ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. गेली अनेक वर्षे ही मंडळे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. मंडळानी गाव व पंचक्रोशीत सामाजिक उपक्रमाद्वारे वेगळी ओळख निर्माण केली असून आम्ही दोन्ही मंडळानी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला असल्याचे दोन्ही मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सांगितले.
आदर्की बुद्रुक येथे वेगवेगळी मंडळे सार्वजनिक उत्सव साजरे करतात. या दोन्ही मंडळांनी एकत्रित येवून गावातील प्रमुख मार्गावरून श्री गणेशमूर्ती ंंची मिरवणुक काढून आपल्या लाडक्या गणपतीला भावपूर्ण भक्तीमय जल्लोषी वातावरणात निरोप दिला.
आदर्की बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व शिवतेज गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह दोन्ही मंडळाचे पदाधिकारी सभासद, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यासह तरुण कार्यकर्ते मिरवणूकीत सहभागी झाले होते.