फलटण, दि १२ : शहर व तालुक्यातील घरगुती तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांनी परंपरेनुसार व कुटुंबांनी भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत आणि जल्लोषात आपल्या लाडक्या गणरायाला आज (गुरुवार दि. १२ सप्टेंबर) रोजी दिवसभरात निरोप देवून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले.
महागाईमुळे श्री गणेशमूर्ती, सजावट साहित्यांच्या किंमती वाढल्या असताना आणि यावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट असतानाही सर्वसामान्य नागरिक यांनी मोठय़ा भक्तीभावाने श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना दि. २ सप्टेंबर रोजी केली.
दि. ५ सप्टेंबर रोजी गौराई आगमन झाल्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले. दि. ६ रोजी हळदी कुंकू समारंभास महिलांनी मोठा प्रतिसाद देवून गौराई हिचे कोतुक केले तर दि. ७ रोजी गौराईचे विसर्जन भक्तीपूर्ण व धार्मिक पुजा करुन केले.
आदर्की ते आंदरुड या दुष्काळी टप्प्यात व बागायती कॅनॉल टप्प्यातही यावर्षी पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला आहे. गणपती उत्सवात भाविक यांनी श्री गणेशाला साकडे घालून सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १० दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक देशभक्तीपर निसर्गरम्य ऐतिहासिक देखावे व लायटींग केले होते. मंडळाचे कार्यकर्ते यांनी व भाविक भक्त यांनी व मान्यवरांचे हस्ते गणेशाची पुजा केली. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळ त्याचबरोबर शुक्रवार पेठ, गजानन चौक, नाना पाटील चौक, मोती चौक, नेहरु चौक, सुभाष चौक, मलठण चौक, गिरवी चौक, शंकर मार्केट, गजानन चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील ग्रामीण भागातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जोषात श्री गणेशाची सेवा केली.
ग्रामीण भागातील मठाचीवाडी, राजूरी, आसू, पवारवाडी, गोखळी, राजाळे, धुळदेव, सांगवी, सस्तेवाडी, खुंटे, साखरवाडी, सुरवडी, तरडगांव, वडगाव, घाडगेवाडी, सासवड, हिंगणगांव, आदर्की बुद्रुक, बिबी, आदर्की खुर्द, मिरगांव, खडकी वाठार निंबाळकर, ढवळ, वाखरी, गिरवी, निरगुडी, दुधेबावी, मिरढे या प्रमुख मोठ्या गावांत सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेश उत्सवात पारंपारीक पध्दतीने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
घरगुती श्री गणेशाला आरती करुन आपली दुचाकी चारचाकी टक्टर व्हॅन जीप बैलगाडी टेम्पोमध्ये तर कही जणांनी एकत्रित येवून अथवा अन्य उपलब्ध वाहनांमध्ये श्री गणेशमूर्ती घेवून जेथे पाणी उपलब्ध आहे त्याठिकाणी गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. यावेळी सव कुटुंबीय सहभागी झाले होते.
सार्वजनिक मंडळ यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात काही ठिकाणी लाऊडस्पीकर लावून बाप्पा मोरया च्या घोषणा देत आपल्या लाडक्या गणपतीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
काही ठराविक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन संध्याकाळी सुरु होवून रात्री उशिरापर्यंत या मिरवणूका निघून उत्साहात गणेशाचे विसर्जन करण्यात येईल.