फलटण, दि. 11 : ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजेगट यांच्यावतीने श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता येथील अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महामेळाव्यात काय निर्णय घेतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदराव पवार यांचे राजकीय घनिष्ठ संबंध असून ना. श्रीमंत रामराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा असताना सातारा येथील खा. श्री.छ.उदयनराजे भोसले व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना एकत्र बोलावून खा. पवार यांनी बैठक घेतली. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अन्य पक्षात जाण्याची इच्छा बैठकीत व्यक्त केली असून आता रामराजे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा संपूर्ण तालुका व सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात सुरु आहे.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपा पक्षात व शिवसेनेत जात असताना पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापती म्हणून ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी घनिष्ठ संबंध व केंद्रात श्रीमंत रामराजे यांच्याविषयी असलेली वेगळी आस्था लक्षात घेवून ना. श्रीमंत रामराजे भाजपामध्ये जातील किंवा स्थानिक राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते शिवसेनेचे शिवबंधन बांधतील याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून भाजपाचा उमेद्वार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर ना. श्रीमंत रामराजे काय निर्णय घेणार या चर्चेला उधान आले आहे. तथापी आता कोणत्याही पक्षाचे नाव न घेता ना. श्रीमंत रामराजे यांनी शुक्रवारी फलटण येथे महामेळाव्याचे आयोजन केल्याने चर्चा रंगल्या आहेत.
फलटण शहर तालुका, सातारा जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेते आपल्या परीने ना. श्रीमंत रामराजे यांच्या निर्णयाविषयी बोलत असून कोणी ना. श्रीमंत रामराजे भाजपा, शिवसेना पक्षात जातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहतील अथवा स्थानिक राजकारण पाहता अपक्ष भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. तथापी शुक्रवारी फलटण येथील महामेळाव्यामध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा निर्णय होईल असे जाणकारांचे मत आहे.