हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून बागेवाडी येथील मोहरम सणाकडे पाहिले जाते

फलटण दि. ११ : फलटण तालुक्यातील बागेवाडी बरड येथे मुस्लिम समाजाचे एकही घर नसताना हिंदू मराठा समाज बांधवांनी एकत्रित येवून  मुस्लिमांचा मोहरम सण (ताबुत ) साजरा करुन अनोखी परंपरा गेल्या 100 वर्षापासून जपली आहे. ताबूत मिरवणुक गावातील प्रमुख मार्गावरून मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी काढून ताबुत विर्सजन करण्यात आले असून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून  बागेवाडी  येथील मोहरम सणाकडे पाहिले जाते. 
मुस्लिम समाजातील पहिला महिना मोहरम सणाला असतो. मुस्लिम समाज बांधव मोहरम सणाच्या निमित्ताने ताबूत  ( डोले ) तयार करून त्याची मिरवणूक काढतात मात्र बागेवाडी बरड  येथे हिंदू समाज बांधव हा सण 100 वर्षापासून मिळून मिसळून साजरा करत आहेत. 
 महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या शिखर शिंगणापुर पायथ्याच्या  कुशीत वसलेल्या व फलटणपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आणि आळंदी –  पंढरपूर पालखी  महामार्गावरील फलटण पूर्व भागातील  बरड ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या बागेवाडी या गावात  हिंदू  हेच मोहरम निमित्ताने ताबुत मिरवणुक काढून मोहरम सण साजरा करतात. 
ताबूतचा  मान पिराजी भैयाजी शिंदे 90 वर्षे या वयोवृध्दाला देण्यात आला असून  त्यांच्या अगोदर  त्यांचे वडीलांकडे मान होता.  शिंदे यांच्या घराण्यात गेल्या अनेक वर्षापासून ताबूतचा मान आहे.  सणामध्ये रामोशी, मराठा, माळी, धनगर समाजातील सर्व समाजबांधव सहभागी होतात. नवसाला पावणारा मोहरम सण म्हणून  मोठ्या श्रद्धेने पाहिले जाते.  मिरवणुकीत गावातील तरुण युवक यांच्यापासून ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले सहभागी होवून पारंपरिक वाद्यांच्या साथीने गाव व परिसरातून ताबूतची मिरवणुक काढण्यात आली. 
  नवस बोलला असल्यास मोहरम सणावेळी भाविक ताबूतला नारळाचे तोरण बांधतात. ताबूतवर जमलेले  नारळ विक्री न करता  दुसरे दिवशी प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून दिला जातो. अशा पध्दतीने हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून मोहरम सण साजरा केला जात आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!