बारामती : बारामती म्हटलं की, थेट राजकारण आठवतं. गेली अनेक दशके बारामती हा महाराष्ट्राच्या राजाकरणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आता याच बारामतीत आपल्याला क्रिकेटचा खेळही पहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बारामतीत पहिला रणजी सामना खेळवला जाणार आहे.
बारामतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. या मुळे प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने बारामतीत होणार असल्याने बारामती आता क्रिकेटच्या नकाशावर आले आहे. बारामतीत पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड असा 12 ते 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान खेळवला आहे, अशी माहिती महाराष्ट्र रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बिरजू मांढरे यांच्यासह अभिजित चव्हाण उपस्थित होते.
13 ऑक्टोबरपासून इतर सामने
महाराष्ट्राचे माजी कर्णधार व क्रिकेट खेळाडू धीरज जाधव यांनी बारामतीत त्यांची क्रिकेट अकादमी सुरू केली असून त्यांच्या प्रयत्नातूनच बारामतीत आता प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने होणार आहेत. गुंजाळ, शिर्के व बागवान यांनी आज बारामतीत येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमची पाहणी केली. बारामतीत अनंत चतुर्दशीनंतर लगेच दुस-या दिवसापासून म्हणजे 13 सप्टेंबरपासूनच निवड चाचणी संघाचे सामने सुरू होणार आहेत. केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकीत बावणे यांसारखे नामवंत खेळाडू बारामतीच्या मैदानावर खेळताना दिसतील. बीसीसीआयचे क्युरेटर प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट देऊन हे मैदान प्रथम श्रेणी व रणजी सामन्यांसाठी उत्तम असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर बारामतीत सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. दरम्यान, 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विरुध्द सौराष्ट्र हा तीन दिवसांचा विजय मर्चंट ट्रॉफीसाठीचा पहिला सामना बारामतीत खेळवला जाणार आहे. बारामतीत होणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा हा पहिलाच सामना असेल. 18 ते 21 जानेवारी 2020 या काळात महाराष्ट्र विरुध्द मुंबई हा चार दिवसांचा कुचबिहार ट्रॉफीचा सामना होणार आहे. बारामतीतील सर्व सामने क्रिकेटरसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.
*‘बारामतीत क्रिकेट संस्कृती रुजेल*
रणजीसह प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमुळे बारामतीत क्रिकेट संस्कृती रुजणार आहे. बारामतीच्या क्रिकेटसाठी हा निर्णय ऐतिहासिक म्हणावा लागेल, त्या मुळे ग्रामीण भागातून क्रिकेटर तयार होण्यासाठी याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धीरज जाधव याने दिली आहे. तर, राज्यात प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी जी मोजकी सर्वोत्तम मैदान आहेत, त्यात बारामतीचेही मैदान आहे. भविष्यात येथे नियमितपणे सामने खेळविले जातील, असे रणजी समिती अध्यक्ष मिलिंद गुंजाळ यांनी म्हटले आहे.