फलटण दि. ९ : फलटण तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने तहसीलदार हनुमंत पाटील यांना मागण्यांचे व आज सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या लाक्षणिक संपाबाबतचे निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत शासन दरबारी तोडगा निघाला नाही तर बुधवार दि. 11 सप्टेंबर पासुन बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करावी, 7 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करुन रिक्त पदे तात्काळ भरावीत, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात, सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी, शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या 6% खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे, सर्व कर्मचाऱ्यांना अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये, लिपिक व लेखा लिपिकाच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पद, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत, पदोन्नतीने व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतानातील तफावत दूर करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रा. शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) राज्य व जिल्हा, तालुका पदाधिकारी, शिक्षक समिती जिल्हा व तालुका पदाधिकारी, शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट) जिल्हा व तालुका पदाधिकारी,जुनी पेंशन हक्क संघटना तालुका पदाधिकारी, शिक्षक बँक चेअरमन व संचालक, कास्ट्राईब शिक्षक संघटना पदाधिकारी, फलटण तालुका तलाठी संघटना व मोठ्या प्रमाणात पेंशन फायटर उपस्थित होते.
जिल्ह्यातील इतर केडरचे संगठन पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी मोठ्या गर्दीत समन्वय समितीचे वतीने निवेदन देण्यात आले.