फलटण दि. 9 : बागेवाडी (बरड) ता. फलटण येथे मुस्लिम समाजाचे एकही घर नसताना हिंदू मराठा समाज बांधव एकत्रित येवून मुस्लिमांचा मोहरम सण (ताबुत उत्सव ) साजरा करुन अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली असून ताबूत मिरवणुक गावातील प्रमुख मार्गावरून काढून नंतर ताबुत विर्सजन करण्यात येत असून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून बागेवाडी येथील मोहरम सणाकडे पाहिले जात आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या शिखर शिंगणापुर पायथ्याच्या कुशीत वसलेल्या व फलटणपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आणि आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गावरील फलटण पूर्व भागातील बरड ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या बागेवाडी (बरड) ता. फलटण येथे हिंदू हेच मोहरम निमित्ताने ताबुत मिरवणुक काढून मोहरम उत्सव उत्साहाने साजरा करतात.
बागेवाडी (बरड) ता. फलटण येथे सर्व जातीधर्माचे लोक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक या भावनेतून हा उत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने उत्साहाने मोहरम सण साजरा केला जात असून बागेवाडी येथे मुस्लिम बांधवांचे एकसुध्दा कुटुंब नाही तथापी पूर्व परंपरागत अनेक वर्षापासून मोहरम हा सण मोठ्या उत्साहाने येथे साजरा करण्यात येत आहे.
सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी ताबूत प्रतिष्ठान करून मंगळवार दि 10 सप्टेंबर रोजी विर्सजन करण्यात येणार आहे. ताबूतचा मान गावातील पिराजी भैयाजी शिंदे (वय 90 वर्षे) या वयोवृध्दाला देण्यात आला असून त्यांच्या अगोदर त्यांचे वडील यांच्याकडे मान होता. शिंदे यांच्या घराण्यात गेल्या अनेक वर्षापासून ताबूतचा मान आहे. मोहरम सणामध्ये गावातील रामोशी, मराठा, माळी, धनगर समाजातील सर्व समाजबांधव सहभागी होतात. नवसाला पावणारा मोहरम सण म्हणून मोठ्या श्रद्धेने पाहिले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून मोहरम सणानिमित्ताने ताबुताच्या आदल्या दिवशी तयार करून रितीरीवाजप्रमाणे पुजा करून दुसरे दिवशी ताबूतची मोठी मिरवणुक काढण्यात येते. ताबूत उत्सव साजरा करण्यात येत असल्याने कोणतीही अनुचित घटना गावात घडत नाही. गावची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
मोहरम सण उत्सवामध्ये गावातील तरुण युवक यांच्यापासून ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले सहभागी होतात. पारंपरिक वाद्यांच्या साथीने गाव व परिसरातून ताबूतची मिरवणुक काढण्यात येते. या उत्साहास बागेवाडी आणि पंचक्रोशीतील 5/6 गावातील ग्रामस्थ उपस्थित असतात.
गतवर्षी नवस बोलला असल्यास मोहरम सणावेळी भाविक ताबूतला नारळाचे तोरण बांधतात. दरवर्षी नारळांच्या तोरणांची संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ताबूतवर तोरणासाठी जमलेले नारळ विक्री न करता दुसरे दिवशी प्रत्येक घरी प्रसाद म्हणून दिला जातो. ताबूत मिरवणुक गावातील प्रमुख मार्गावरून काढून नंतर ताबुत विर्सजन करण्यात येते अशा पध्दतीने हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून बागेवाडी (बरड) ता. फलटण येथील मोहरम सणाकडे पाहिले जाते.