फलटण दि. ७ : सातारा जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी यांच्या प्रलंबित विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करुन तातडीने सोडविण्याबाबत शासनाने विचार करावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवगीय कर्मचारी संघटनेच्या खंडाळा शाखेच्यावतीने खंडाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले याना देण्यात आले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, लिपिक व लेखा लिपिकांच्या बाबतीत ५ व ६ व्या आयोगात झालेल्या अन्यायाबाबत वेतन सुधारणा करून समान काम समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे निश्चित करण्याबाबत कार्यवाही करणे, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता व शैक्षणिक भत्ता मिळावा, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, ६ व्या आयोगातील वेतननुसार राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची होणारी वसुली तात्काळ थांबविण्यात यावी व त्यांना रिक्त पदावर पदोन्नती कार्यवाही सत्वर करण्यात यावी व सव कर्मचार्यांची अजित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शासनाने आमच्या रास्त मागण्यांबाबत वेळेत दखल न घेतल्यास समन्वय समिती व राज्य संघटनेच्या सुचनांनुसार नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागणार असून दि. ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. सोमवार दि ९ सप्टेंबर रोजी एक दिवस लाक्षणिक संप करण्यात येणार असून या दोन्ही बाबींकडे शासनाने दुर्लक्ष केलेस बुधवार दि. ११ सप्टेंबर पासून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी नाईलाजास्तव बेमुदत संपावर जातील असा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवगीय कर्मचारी संघटनेच्या खंडाळा शाखेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर खंडाळा लिपिक कर्मचारी संघटना अध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटणे, सचिव जितेंद्र गायकवाड, व सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू पठाण यांच्या सह्य़ा आहेत.