फलटण दि. ५ : गोखळी ता. फलटण येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित संस्थेच्या वतीने दिपस्तंभ पुरस्कार २०१९ नुकताच जाहीर झाल्याने श्रीराम पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित दिपस्तंभ पुरस्कार २०१९ श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोखळी ता फलटण यांना कोल्हापूर विभाग गट क्रमांक १ मधून द्वितीय क्रमांक जाहीर झाला असून सहकार आयुक्त सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सतीश सोनी व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते नागपूर येथे नुकतेच दिपस्तंभ पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक संपन्न झाले. यावेळी श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक आनंदराव खोमणे व्यवस्थापक महेश जगताप व बाळासाहेब धनवडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
श्रीराम पतसंस्थेने सन २०१७ – २०१८ यावर्षीही कोल्हापूर विभाग गट क्रमांक १ मधून तृतीय क्रमांक मिळविला होता.
श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची डॉ. शिवाजीराव गावडे (सवई) व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी सन २००० साली फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गोखळी येथे स्थापना केली. पतसंस्थेने १९ वर्षे पूर्ण केली असून संस्थेकडे ६ कोटी ७० लाख रुपयांच्या ठेवी असून ५ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेची गोखळी ता. फलटण येथे एकच शाखा असून ९०३ सभासद आहेत. व्यवस्थापक म्हणून महेश शंकर जगताप काम पाहत आहेत.
सध्या सहकारी क्षेत्रातील अनेक पतसंस्था किंवा इतर संस्था डबघाईला आलेल्या असताना फलटण तालुक्यातील गोखळी येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आपला नावलौकिक व सामाजिक कार्यक्रमाची बांधिलकी सोडली नाही. पतसंस्था विविध सामाजिक उपक्रम राबवुन आथिर्क कामकाजाबरोबर समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवित असल्याने विविध पुरस्कार प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.
Congratulation