फलटण दि. ५ : फलटण शहर व तालुक्यातील गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने, शिस्तीने, शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस दलाने विशेष दक्षता घेतली असून शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर आज (गुरुवार दि. ५) रोजी पोलीस पंथ संचलन घेण्यात आले.
यापूर्वी फलटण शहर व साखरवाडी आणि बरड ता. फलटण येथे पथ संचलन आणि दंगा नियंत्रण पथकाने प्रात्यक्षिक घेतले होते.
फलटण शहरातील पथ संचलनामध्ये प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसिलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचेसह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते.
पथ संचलनामध्ये २ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक/पोलीस उप निरीक्षक, ५० पोलीस कर्मचारी, ७२ होमगार्ड, ७ पोलीस वाहनांचा समावेश होता. शहरातील सोमवार व मंगळवार पेठेसह विसर्जन मिरवणूक मार्गावरुन पोलीस पथ संचलनाद्वारे या मार्गाची पाहणी करुन समस्यांची पाहणी करण्यात येवून त्यादूर करण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात आल्या.
गणेशोत्सव कालावधीत कोणी व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर चोख पोलीस बंदोबस्ताद्वारे अशा लोकांविरुद्ध त्वरित कारवाईसाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.