फलटण दि. ४ : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात येणारा सामाजिक, जिल्हास्तरीय, पुणे विभागीय व राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी पुर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यावर आलेल्या भयंकर संकटामुळे स्थगित करून कार्यक्रमावर होणारा खर्च सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मुख्यमंत्री पूरग्रस्त निधीला देण्याचा पत्रकार संघाने घेतलेला निर्णय योग्य असून तो कौतुकास पात्र असल्याचे ज्येष्ट पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
येथील शिवसंदेशकार माजी आमदार कै. कॉम्रेड हरिभाऊ स्मृतीदिनानिमित्त मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी येथील पत्रकार भवन येथे शहर व तालुक्यातील ग्रामीण पत्रकार यांचेवतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर प्रा. रमेश आढाव नसीर शिकलगार यशवंत खलाटे सुभाष भांबुरे श्रीरंग पवार विनायक शिंदे नगरसेवक अजय माळवे सुधीर अहिवळे अध्यक्ष आनंदा पवार यांची उपस्थिती होती.
कै. हरिभाऊ यांनी पत्रकार कामगार खंडकरी शेतकरी व समाजातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अभिप्रेत अशीच पत्रकारिता केली. हरिभाऊ हे कधीच राजकीय नेते यांचेकडे गेले नाहीत तर नेते मंडळी शिवसंदेशमध्ये येत असत असे सांगून कोणाला बरे वाटण्यासाठी पत्रकारिता करु नये असे आवाहन बेडकिहाळ यांनी केले.
दोन राजकीय नेत्यांनी राजकारण करताना कसे वागावे हे स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व कै. हरिभाऊ निंबाळकर यांनी १९५७ च्या निवडणुकीत दाखवून दिले तो आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगून फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे काम आदर्शवत असून ग्रामीण पत्रकार यांना घर मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण एकविचाराने एकदिलाने काम करुया. संघटीत राहिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नसल्याचे सांगून पत्रकार भवन येथे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असलेल्या मुला मुलींनी भविष्यात समाजात जाताना हरिभाऊ यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावेत हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
कै. कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ सामाजिक जिल्हास्तरीय पुणे विभागीय व राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार देवून पत्रकार यांचा गौरव करते मात्र यावर्षी पुर परिस्थिती निर्माण झाल्याने हा सोहळा थांबवून पुरग्रस्त भागात मदत करण्याची घेतलेली भूमिका आदर्शवत असल्याचे प्रा. रमेश आढाव यांनी सांगितले.
कै. कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष होते. पत्रकार कामगार नेते खंडकरी व शेतकरी यांचेसाठी त्यांनी उभे केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून पत्रकार यांनी कै. हरिभाऊ यांनी जोपासलेली पत्रकारिता पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल अशी अपेक्षा प्रा. रमेश आढाव यांनी व्यक्त केली.
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ गेली १७ वर्षे कै. कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी सामाजिक जिल्हास्तरीय पुणे विभागीय व राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित केले जाते तथापी यावर्षी सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण झाली असल्याने हा पुरस्कार सोहळा थांबवून पुरस्काराची रक्कम पुरग्रस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याचे ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्कप्रमुख श्रीरंग पवार यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले.
प्रा. सतिश जंगम नगरसेवक अजय माळवे व प्रतापसिंह निंबाळकर यांची समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. रविवार पेठ तालीम मंडळाचे पदाधिकारी यांनीही श्रध्दांजली वाहिली.
कार्यक्रमास स. रा. मोहिते प्रकाश सस्ते हनुमंतराव चव्हाण नानासाहेब मुळीक सुभाष सोनवलकर यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील ग्रामीण पत्रकार व स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदा पवार यांनी शेवटी आभार मानले.