फलटण, दि 2 : फलटण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांसह परंपरेनुसार अनेक कुटुंबांनी भक्तीपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना आज (सोमवार दि. 2 सप्टेंबर) रोजी केली. महागाईमुळे श्री गणेशमूर्ती, सजावट साहित्यांच्या किंमती वाढल्या असल्या तरीही व यावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे सावट असले तरीही सर्वसामान्य नागरिक हा गणपतीचा मांगल्याचा उत्सव भक्तीभावाने साजरा करतो. त्यासाठी आपल्या आवडीचे साहित्य खरेदी करताना तो मागेपुढे पहात नाही हे आजचे बाजारपेठेतील दृष्य पाहिल्यावर दिसून आले.
आदर्की ते आंदरुडपर्यंतच्या फलटण तालुक्यातील टप्प्यात व बागायती कॅनॉल टप्प्यातही यावर्षी पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताक्रांत आहे. यावर्षी श्री गणरायाचे स्वागत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणेच सामान्य कुटुंबांनीही मोठ्या भक्तीभावाने केले.
फलटण तालुका व शहरातील नागरीक यांनी फलटण शहरात गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य, विद्युत माळा खरेदीसाठी गर्दी केल्याने जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे आज दिसून येत होते.
श्री गणेशाच्या प्रतिष्ठापने दिवशी सोमवारी गणेश मूर्तींच्या स्टॉल बरोबरच पुजेचे साहित्य, प्रामुख्याने जानवे, रुमाल, धुप, अगरबत्ती, मोत्यांचे हार, कापूर, कापसाच्या वाती, फळ, फळावळ यांचेही स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. खरेदीसाठी लोकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले होते. ग्राहक श्री गणेशमूर्तीच्या शोधात सर्व स्टॉलना भेट देवून मूर्ती आणि किंमतीची चौकशी करुनच खरेदी करताना दिसून आले.
घरातल्या श्री गणेश उत्सवासाठी तयार मंडप व आकर्षक छतही विक्रीस आले आहेत. बाजारपेठेमध्ये नागरीक, महिला, युवक, युवती यांच्यासह अबालवृध्द यांनी मूर्ती व सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याने शहरात दुचाकी वाहनांची गर्दी बाजारात होत होती. मात्र फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्यावतीने अधिकारी व कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या मदतीने बाजारपेठेतील विविध भागात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मिरवणुका काढुन आपल्या मूर्ती मिरवणूकीने मंडपापर्यंत नेल्या जातात. त्यामध्ये फलटण शहरातील शुक्रवार पेठ गणेशोत्सव मंडळ, गजानन चौकातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नाना पाटील चौक, मोती चौक, नेहरु गणेशोत्सव मंडळ, सुभाष गणेशोत्सव मंडळ, मलठण गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जोषात श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केली.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील आसू, पवारवाडी, गोखळी, राजाळे, धुळदेव, सांगवी, सस्तेवाडी, खुंटे, साखरवाडी, सुरवडी, तरडगांव, सासवड, हिंगणगांव, आदर्की बुद्रुक, बिबी, मिरगांव, वाठार निंबाळकर, ढवळ, वाखरी, गिरवी, निरगुडी, दुधेबावी, मिरढे या तालुक्यातील प्रमुख मोठ्या गावांसह विविध गावांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सवाला फलटण शहर व तालुक्यात प्रारंभ झाल्यानंतर आगामी 2/3 दिवसात बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विद्युत रोषणाई व अन्य सजावटीची कामे पूर्ण करुन देखावे भाविकांना पाहण्यास खुले होतील. काही ठरावीक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी केलेले आकर्षक देखावे व विविध ऐतिहासिक, पौराणिक व सद्य परिस्थितीवर असणारे देखावे एक दोन दिवसात सादर होतील त्यानंतर भाविकांची गर्दी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
श्री गणेशाच्या आगमनानंतर दोन दिवसांत ज्येष्ठा गौरी आवाहन असल्याने बाजारपेठेत गौरीचे मुखवटे, अखंड गौरी बॉडी उपलब्ध आहेत. मुखवटे 550 रुपयापासून पुढे व बॉडी 800 रुपयापासून पुढे विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची आकर्षक मांडणी केलेली आहे. गौरींच्या सजावटीसाठी लागणारे दागिने, चित्रे, आकर्षक फ्लॉवर पॉट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गौरी सजावटीच्या साहित्याबरोबर फुले खरेदीसाठी भाविक गर्दी करीत होत मात्र फुलांचे दर वाढल्याने फुले खरेदी करताना मर्यादा आल्या आहेत.
बाजारपेठेमध्ये सजावटीच्या साहित्याची रेलचेल असून रुपेरी वर्क असलेली कागदाची झुंबरे, रंगीबेरंगी कागदाच्या झिरमिळ्या, विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या फुलांचे हार, मूर्तीसाठी लागणारे लहान हार, घरगुती गणपतीसाठी विविध आकारातील मखर, या वस्तूंचा बाजारपेठेत झगमगाट आहे. रंगीबेरंगी तोरणाच्या माळा, थर्माकोलची मंदिरे, मखर, विद्युत रोषणाईच्या माळांचा झगमगाट ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत आहे. जाळीदार पडदे, पाण्यावर तरंगणारी फुले अशा सजावटीच्या विविध साहित्यानी शहरातील व्यापार्यांनी आपली दुकाने विक्रीसाठी सजविली आहेत.
गौरीसमोर फराळाच्या पदार्थाबरोबरच फळेही ठेवण्यात येत असल्याने फळांना मागणी आहे सध्या बाजारात सफरचंद 80 ते 120 रु किलो, केळी 30 ते 50 रुपये डझन, मोसंबी 80 रु किलो, चिक्कू 60 रु किलो, डाळींब 80 रु किलो, पेरु 80 रु किलो तसेच वजनावर कच्ची सिताफळेही उपलब्ध आहेत.