सोलापूर : कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगानिमित्त आयोजित जाहीर सभेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी पार्क मैदानावरील जाहीर सभेने झाला.
या यात्रेचे भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापुरात तुळजापूर नाका येथे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वागत केले.
तुळजापूर नाका, पुना नाका मार्गे रोड शो करत ही यात्रा पार्क मैदान येथे दाखल झाली.
व्यासपीठावर ना. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.