फलटण दि. १ : नीरा नदीत वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थिती निर्माण होवून फलटण तालुक्यातील २१ गावातील ८३५ शेतकरी व ग्रामस्थांचे शेतजमिनी, शेतातील उभी पिके, फळबागा, राहती घरे, जनावरे वगैरेंचे मोठे नुकसान झाले असून महसूल, कृषी खाते आणि पंचायत समितीच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील आसू, ढवळेवाडी, सरडे, शिंदेनगर, गोखळी, खटकेवस्ती, साठे, जिंती, मिरेवाडी, पाडेगाव, रावडी खु||, खुंटे, कांबळेश्वर, सोमंथळी, रावडी बु||, खामगाव, मुरुम, होळ, सांगवी, सोनगाव, कुसुर वगैरे २०/२१ गावे महापूर बाधीत असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते तर साठे, गोखळी येथील काही कुटुंबे स्थलांतरित करुन त्यांना निवारा कॅम्पमध्ये दाखल करण्यात आले होते.
फलटण तालुक्यातील ८३५ शेतकरी कुटुंबांच्या ३११.६९ हेक्टर क्षेत्रावरील ऊस, भाजीपाला, कडवळ, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मका, घास, बाजरी, कापूस, ताग, गुलडी वगैरे बागायत क्षेत्रातील पिकांचे ३३ % पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याच गावातील १.४० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे ३३ % पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात आले आहे.
नदिकाठची एकूण ८ कुटुंबांची राहती घरे पाण्याखाली गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त झाले असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची विनंती तहसीलदार यांना करण्यात आली आहे. त्यामध्ये गोखळी ४, साठे २ आणि मिरेवाडी ढवळेवाडी प्रत्येकी १ अशा एकूण ८ कुटुंबांच्या राहत्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ५ घरांची अंशतः आणि १ घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
ज्यांच्या शेतजमिनी, जनावरांचे गोठे पाण्यात पूर्णतः अथवा अंशतः वाहुन गेले किंवा अन्य काही नुकसान झाले असेल तर त्याची माहिती घेऊन पंचनामे करण्यात येत असल्याचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले.