गणेशोत्सव काळात गणेश मंडळ यांनी काळजी घ्यावी : उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे

फलटण दि. २८ :  शहर व तालुक्यात श्री गणेशोत्सव गणेश मंडळे यांनी गतवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा केला. भारतीय संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न गणेशोत्सव उत्सवातून होत असून त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा. गणेशोत्सव काळात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी व्यक्त केली.  
गेल्या वर्षी फलटण शहर व तालुक्यात गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यात आला. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले प्रबोधनात्मक देखावे, उत्कृष्ट मूर्ती, शांततेत काढलेल्या विसर्जन मिरवणुका यासाठी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या “गणराया अवॉर्ड” पुरस्कारांचे वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे हस्ते येथील इंदिरा गांधी सांस्कृतीक भवन फलटण येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी तहसीलदार हनुमंत पाटील होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, नगर परिषद बांधकाम समिती सभापती तथा स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाच्या प्रमुख अड. सौ. मधुबाला भोसले, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन सावंत, पोलीस उपनिरीक्षक सौ. वृषाली देसाई, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, परीक्षक समिती सदस्य प्रा. शिवलाल गावडे व त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, किरण बोळे यांची उपस्थित होती. 
गणराया स्पर्धा फलटण शहर आणि ग्रामीण या दोन विभागात घेण्यात आली होती. ज्या गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवुन समाज प्रबोधनात्मक देखावे गणेशोत्सव मंडळांनी राबविले त्या मंडळांचे परिक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती माफत परिक्षण करून हे पुरस्कार देण्यात आल्याचे तानाजी बरडे यांनी सांगितले. 
फलटण तालुका ग्रामीण भागातील प्रथम क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजाळे, द्वितीय क्रमांक संत तुकाराम सार्वजनिक गणेश मंडळ काशीदवाडी, तृतीय क्रमांक स्वराज्य युवक प्रतिष्ठान गणेश मंडळ निंबळक, उत्तेजनार्थ श्रीनाथ गणेशोत्सव मंडळ कणसे वस्ती गुणवरे व  शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ शेरेचीवाडी यांना देण्यात आला. 
फलटण शहरमधून प्रथम क्रमांक अनिकेतराजे नाईक निंबाळकर गणेश मंडळ बुधवार पेठ फलटण, द्वितीय क्रमांक नवदुर्ग गणेश मंडळ शुक्रवार पेठ फलटण, तृतीय क्रमांक रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ फलटण आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मलठण गणेशोत्सव मंडळ मलठण फलटण यांना देण्यात आले. 
सूत्रसंचालन व प्रास्ताविक फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांनी केले. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमन यांनी शेवटी आभार मानले.
कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील मंडळांचे पदाधिकारी निवड समिती सदस्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!