फलटण दि. 28 : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथील शंभूराज आटस यांच्या कुंभारगल्लीतील श्री गणेशमूर्ती बनविण्याच्या कारखान्यात श्री गणेश उत्सव आठ दिवसांवर येवून ठेपल्याने गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यासाठी लगभग सुरु आहे.
रविंद्र लक्ष्मण कुंभार व दिपक लक्ष्मण कुंभार हे लहानपणीपासून आपला पिढीजात कुंभार व्यवसाय करीत असून रविंद्र कुंभार यांचे शालेय शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे. यापूर्वी वडील लक्ष्मण कुंभार हा व्यवसाय करीत असताना दोघे बंधू यांनी कुंभार व्यवसायाचे धडे लहानपणी गिरविण्यास सुरुवात केली आणि आज हा व्यवसाय ते सक्षमपणे सांभाळीत आहेत.
रविंद्र कुंभार हे श्री गणेशमूर्ती उत्तमपणे विविध आकारात साकारत असुन त्यांच्या दुकानात 50, 100, 250, 500, 1000, 2000, 5000, 10000, 15 हजार रुपयांपासून 51 हजार रुपयांपर्यंत गणेश मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गणेश मूर्ती साकारताना पीयुपी शाडु व मातीच्या मूर्ती बनविल्या जात असून यावर्षी पीयुपी कलर माती जीएसटी व कामगार यांची मजुरी खच वाढल्याने याचा परिणाम गणेश मूर्तींच्या किंमती वाढल्या असल्याने जाणवत आहे मात्र ग्राहक आपल्याला हवी असणारी गणेश मूर्ती करण्यासाठी चोखंदळ झाला असल्याचे रविंद्र कुंभार यांनी सांगितले.
म्हसवड परिसरामध्ये 8 ते 9 कुंभार व्यवसायायिक असून ते आपल्या कारखान्यात गणेशमूर्ती व दुर्गादेवी मूर्ती बनवितात मात्र काही वर्षांपूर्वी पासून राजस्थानी कारागीर येथे गणेश विक्री करीत असल्याने या व्यवसायाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगून तरीही आम्ही कुंभार व्यवसायिक मूर्तींमध्ये बनविताना कोणतीही तडजोड न करता आमची कला साकारण्यासाठी सर्व कुटुंबिय रात्रंदिवस झटत असतो. साधारण यावर्षी आम्ही आमच्या कारखान्यात 1500 लहान मोठ्या गणेश मूर्ती मंडळ व ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.