फलटण दि. २५ : श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील इ. १२ वीतील सहकार विषय असलेल्या विद्यार्थ्यांना सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून सभेच्या कामकाजाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने फलटण येथील सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास उपक्रम पार पडला.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथील इ. १२ वीतील विद्यार्थ्यांना सहकार विषयात सहकारी संस्थांच्या सभेचा अभ्यास अभ्यासक्रमात असून सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी सहकार शिक्षक प्रा. सतीश जंगम यांनी श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अभ्यासासाठी सभेला विद्यार्थ्यांना बसण्याची लेखी परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना सभेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून दिला.
सद्गुरु उद्योग समूहाचे प्रमुख व सद्गुरु पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी या प्रशालेचे विद्यार्थी गेली आठ-नऊ वर्षे सतत सभेला उपस्थित राहून सभेचा अभ्यास करतात हे निदर्शनास आणून दिले.
वाढत्या भांडवलशाही वातावरणात सहकार चळवळ टिकविणे व वाढविणे आवश्यक असून तरुणांनी सहकार क्षेत्रात आले पाहिजे. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अभ्यासासाठी तरुण विद्यार्थी उपस्थित राहिल्याने त्यांना सहकार चळवळी बद्दल आकर्षण निर्माण होईल असे सांगून विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सतीश जंगम यांचे कौतुक सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे अधिकारी सुनील धायगुडे यांनी केले.
सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम फणसे, व जनरल मॅनेजर संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहकारी संस्थेच्या सभेस बसून माहिती घेण्यास परवानगी दिल्याबद्दल शिक्षक सतीश जंगम यांनी सहाय्यक उपनिबंधक फलटण यांचे आभार मानले.