फलटण येथे हरित वसुंधरा प्रकल्प अंतर्गत कृषी महाविद्यालय शेतात १३०० झाडांचे रोपण

फलटण दि. २३ : येथील फलटण डॉक्टर्स असोसिएशन व कृषी महाविद्यालय फलटण  आणि पर्यावरण प्रेमी फलटणकर नागरीक यांच्या तन मन धनाच्या सहकार्याने डॉ महेश बर्वे यांच्या स्वप्नातील हरीत वसुंधरा  संकल्पनेतील घनदाट जंगल प्रकल्पाचा आज ( शुक्रवार दि. २३) रोजी पहिला टप्पा  कषी महाविद्यालयाच्या जमिनीवर १३०० देशी झाडांचे रोपण करून यशस्वीरित्या संपन्न झाला. 
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हरित वसुंधरा उपक्रमासाठी एका क्षणात महत्वपूर्ण अशी शेती महाविद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर सुरु झाला हरित प्रकल्पाचा प्रवास. फलटण डॉक्टर्स असोसिएशन व कृषी महाविद्यालय फलटण  आणि पर्यावरण प्रेमी फलटणकर नागरीक यांच्या सहकार्याने झाडांचे रोपण करण्यात आले. 
एका तासात सर्व देशी झाडांचे रोपण पूर्ण करण्यात आले यासाठी शेती महाविद्यालयाचे प्राचार्य  सागर निंबाळकर ,  निकम  व त्यांचा सर्व सहकारी शिक्षकवृंद  आणि विद्यार्थी, फलटण डॉक्टर्स संघटनेचे बहुसंख्य सभासद आणि पर्यावरण प्रेमी फलटणकर नागरीक यांचे या उपक्रमासाठी अनमोल सहकार्य लाभले .
निसर्गाच्या सान्निध्यात कृतज्ञता व आदरभाव मनात ठेवून उतराई व्हावे व आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी  पर्यावरण रक्षणाच्या उदात्त कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या अनमोल विचारधारेतून तमाम फलटणकर मंडळी आज शेती महाविद्यालयाच्या जमिनीवर एकत्र आली व उपक्रम राबविण्यात आला. 
भुसभुशीत मातीला पाय लागले. क्षणात वृथा अभिमान , अहंकार , मातीत गळून पडले 
सामाजीक प्रतिष्ठेच्या , शिक्षणाच्या , संपत्तीच्या पोकळ झुली हवेत उडून गेल्या , हाताने माती उकरण्यात येऊ लागली ,बऱ्याच वर्षानंतर बोटांच्या नखात दुर्मीळ झालेली माती गेली , बोटांचे वय अगदी लहान झाले , हातांनी खड्डे घेतले गेले , सहकारी मदतीला आले , कोणी पिशवी फाडून देऊ लागले , कोणी त्या पिशव्या बाहेर नेऊ लागले , मुळांसकट झाडे खड्यात अगदी पोटच्या पोरांसारखी लावली गेली , मातीने खड्डे भरले आणि नंतर पायाने माती घट्ट करण्यात आली व मग पाणी देण्यात आले. 
आज पर्यावरण रक्षणाच्या कार्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जात होता 
आणि आम्ही सर्वच त्या  सुवर्ण क्षणांचे   साक्षीदार झालो होतो. वृक्षारोपण कार्यक्रमात  माता भगिनींची संख्या आणि उल्हास प्रचंड होता. हरीत वसुंधरा संकल्पनेतील हा घनदाट जंगल प्रकल्पाचा फलटणकर बर्वे पॅटर्न सर्वांचे सहकार्य आणि आशिर्वाद यांच्या जोरावर यशस्वी होईल यात तीळमात्र शंका नाही ही भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 
कषी महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य सागर निंबाळकर यांनी यापुढे या प्रकल्पाच्या देखभालीचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतले आहे अर्थात फलटण डॉक्टर्स संघटनेची त्यांना खंबीर साथ लाभणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समाजोपयोगी उपक्रमास आपणा सर्वांचे असेच सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 
वृक्षारोपणासाठी जमीन तयार करणे , खड्डे घेणे , त्यांना लगेच पाणी देणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे नितीन पाठारे,  अमोल कुंभार, बापू मदने  व त्यांचे सर्वच सहकारी आणि कार्यक्रमात खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देण्यात आले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!