फलटण दि. २३ : नाईकबोमवाडी, ता. फलटण गावचे हद्दीत, तातमगिरी डोंगर पायथ्याशी मंगळवार दि. २० रोजी दुपारी ३.३० वाजता ३ अनोळखी इसमांनी पती-पत्नीस मारहाण करुन त्याच्याकडील सोने चांदीचे दागिने, मोबाईल, रोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचे बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांनी सांगितले.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सागर नवलु बर्गे( वय ३० रा. ल्हासुरणे ता. कोरेगाव) हे फर्निचर व्यावसायिक आपली पत्नी सौ. कीर्ती बर्गे यांच्या समवेत नातेवाइकांकडे वास्तू शांती समारंभासाठी नाइकबोमवाडी ता. फलटण येथे आले असता तातमगिरी डोंगरावर दर्शनासाठी गेले तेथे निर्जनस्थळी काळ्या रंगाचे, बिगर नंबरचे पल्सर गाडीवरुन आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी या दाम्पत्यास मारहाण करुन त्यांच्याकडील साडेपाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, पट्टीचा गंठण, एक तोळा वजनाची सोन्याची ठुशी, एक तोळा वजनाचे सोन्याचे २ डोरली असलेले मिनी गंठण, अर्धा तोळा वजनाच्या कानातील २ रिंगा, २ मोबाइल हँडसेट, १५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि कागदपत्रे असा सुमारे ९९ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला असल्याची नोंद झाली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले करीत आहेत. या संशयिताकडून या भागातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.