फलटण : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाने पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून जमा झालेल्या मदतीचे प्रत्यक्ष वाटप पाटण तालुक्यातील चाफळ खोर्यातील विरेवाडी, पाटवडे, बाभळवाडी गावातील आपदग्रस्तांना केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती राजेश पवार, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, तेजस शिंदे यांची उपस्थिती होती. ही मदत शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, महेश सुतार, अमोल नाळे, बिनेश कोलमविट्टील यांनी पोहोच केली.
येथील शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी साहित्य जमा करण्याचे आवाहन शहरवासीयांना करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू आदींच्या स्वरुपात आपली मदत मंडळाकडे जमा केली होती. जमा झालेल्या साहित्याचा ट्रक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.