बारामती : साडेचार महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशा घरगुती उपचाराची अपुरी व अर्धवट माहिती मिळाल्याने मावशीने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. पण गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. त्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली. शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत तिचा श्वास बंद झाला, पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी दिली.
बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने व भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान व अत्यंत युध्दपातळीवर केलेल्या शस्त्रक्रियामुळे आज ऊस तोड मजूराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला.