सातारा : दिनांक ७, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेवून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून या शाळेत अत्याधुनिक ग्रंथालयाची निर्मिती करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचनासाठी या ग्रंथालयात ठेवले जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी आज केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेवून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस,” साजरा करण्यात आला. यावेळी जि.प.सातारा अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) बोलत होते. या कार्यक्रमाला मा.ॲड.भिमराव आंबेडकर, निवृत्त न्यायाधीश मा.डॉ.यशवंत चावरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मा.श्री.विजयकुमार गायकवाड, शिक्षण सभापती मा.श्री.राजेश पवार, कृषी सभापती मा.श्री.मनोज पवार, समाज कल्याण सभापती मा.श्री.शिवाजी सर्वगोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.श्री.राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.शिवाजीराव चव्हाण, शाळेच्या मुख्यध्यापिका मा.सौ.शबनम मुजावर, आदी उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये अत्याधुनिक ग्रंथालयाची निर्मिती केली जाईल, या ग्रंथालयाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचविले जातील. ही शाळा सर्वोत्तम करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातूनही ही वास्तु आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी शेवटी सांगितले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेथे जेथे गेले तेथे मी जात आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. या शाळेत येवून मी भावूक झालो. या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या शाळेच्या पटसंख्या वाढण्यासाठी काळानुसार शाळेत बदल करा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवून विद्यार्थी शिकत आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर पीएचडी करत आहेत. महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस,” साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी अभिनंदन करतो. तसेच शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य एका छत्राखाली उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मा.ॲड.भिमराव आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
निवृत्त न्यायाधीश मा.डॉ.यशवंत चावरे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. विद्यार्थी दिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजक : शिक्षण व समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन