फलटण : धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचे नेतृत्व करण्यास मी सदैव तयार आहे. यासाठी दिल्लीलाही नमवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. फलटण नगर परिषदेच्यावतीने पृथ्वी चौकाचे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर चौक असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी सभापती रामराजे बोलत होते.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, तालुक्यात सर्वधर्मीय लोक राहतात. याठिकाणी कधीही जातपात असा भेदभाव नाही. प्रारंभी नगराध्यक्षा नीता नेवसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नगरसेविका वैशाली चोरमले यांनी हा नामकरणाचा प्रस्ताव पालिकेसमोर मांडला आणि त्यास मंजुरी मिळाल्याचे सांगितले.
शैक्षणिक आरक्षणास प्राधान्य
मराठा आरक्षणासंदर्भात बरीच नेते मंडळी आपल्याला भेटली. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही भेटलीत. आरक्षणाबाबत प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत पुढच्या पिढीचा विचार करता किमान शिक्षणातील आरक्षण मंजूर करून घ्यावे, राजकारणातील आरक्षण नंतर मिळाले तरी चालण्यासारखे आहे, असे मतही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.