फलटण | श्रीमंत मालोजीराजे यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या इतिहासात तीन महत्त्वाच्या घटनांनी अधोरेखित झाली आहे. एक- महाराष्ट्राला गुजरातला पाटबंधारे व विद्युत पुरवठा यासाठी वरदायी ठरणारे कोयना धरण, दुसरे प्रतापगडावर, महाराष्ट्राला कायमस्वरूपी प्रेरणा देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलाच भव्य अश्वारूढ पुतळा उभारून त्याचे अनावरण तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते केले आणि तिसरी घटना म्हणजे याच कार्यक्रमांमुळे संयुक्त महाराष्ट्र देण्यासाठी पंडित नेहरूंचे झालेले मतपरिवर्तन. आपल्या संस्थानला भारताच्या स्वातंत्र्याचा सर्व फायदा मिळावा यासाठी एवढे मोठे प्राचीन संस्थान, संस्थानच्या प्रमुख इमारती, विमानतळ आणि तत्कालिन खजिन्यातील शिल्लक रक्कम 65 लाख यासह भारतीय संघराज्यात विलीन करणारा मोठ्या मनाचा राजा रयतेचा असा हा एकमेव राजा होता. त्यामुळेच राजेपद गेल्यावरही आपल्या लोकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, राज्याच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील असणारे श्रीमंत मालोजीराजे लोकांच्या मनातही ‘विकासाचे राजे’ म्हणूनच राहिले; असे मत भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की; महाराष्ट्रातील प्राचीन व सुमारे 750 वर्षापूर्वीच्या नाईक निंबाळकर या राजघराण्याच्या राजधानीतील फलटण नगरीमध्ये आजच्या समारंभानिमित्त येण्याचे मला भाग्य लाभले. फलटण संस्थानचे एक द्रष्टे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीतून सन 1894 मध्ये सुरू झालेल्या मुधोजी हायस्कूललाही प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी हीच परंपरा कायम ठेवून सन 1917 पासून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फलटण, माण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार केला. अशा या राज्यातील जुन्या ज्येष्ठ अशा शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मला बोलावले हेही माझे भाग्यच आहे.
नाईक निंबाळकर राजघराणे आणि आमच्या कदम कुटुंबाचा खूप जुना संबंध आहे. भारती विद्यापीठाचे तहहयात अध्यक्ष असलेले महाराष्ट्राचे एक वैचारिक नेते आदरणीय यशवंतराव मोहिते साहेब आणि श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा कौटुंबिक नातेसंबंध आणि प्रदीर्घ असा राजकीय संबंध होता. आदरणीय मोहिते साहेब, भाऊ यांचेमुळे भारती विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय डॉ.पतंगराव कदम साहेब यांचा या राजघराण्याशी जवळचा संबंध आला. विशेषतः श्रीमंत शिवाजीराजे यांच्याशी त्यांचे आपुलकीचे नाते होते. पिट्टूबाबा मोहितेसाहेबांचे म्हणजे आमचेही नातूच आहेत. भाऊंनी पतंगराव कदम साहेबांना सांगून ठेवले होते की, पतंगराव, राजकारण काहीही असो, आपण कायम या घराण्याबरोबर राहायचे आहे. साहेबांनी हे नंतर आम्हालाही सांगितले आहे. त्यामुळे मी, आमचे विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित व भारती हॉस्पिटलच्या प्रमुख सौ.अस्मिता असे सारेजण आणि संपूर्ण भारती विद्यापीठ परिवार रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे तुमच्यासोबत कायम आहोत; असे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की; मला याप्रसंगी श्रीमंत मुधोजीराजेंबद्दल आदरयुक्त अभिमान वाटतो. कारण ब्रिटीश काळातही त्यांनी आपल्या संस्थानचा, पुरोगामी विचाराच्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटविला होता. त्यांनी सन 1894 मध्ये आपल्या प्रजेकरिता आरोग्य, बांधकाम, पाटबंधारे, इत्यादी क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात फार मोठे काम दूरदृष्टीने केल्याचे दिसून येते. दक्षिण महाराष्ट्रातल्या इतर संस्थानापेक्षा शिक्षणातले वेगळे प्रयोग त्यांनी केले. संस्थानमध्ये मराठी माध्यमाप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र बुक डेपो, भारताची प्राचीन संस्कृती, वेदविद्या यांचे शिक्षण मिळण्यासाठी पहिली वेदशाळा, स्त्री शिक्षण प्रसारासाठी महिलांना व्यावसायिक शिक्षणासाठी भरतकाम, शिवणकाम, चित्रकला, संगीत याचे वर्ग, सन 1907 पासून सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण, मागासवर्गीयांसाठीही मोफत शिक्षण व गावागावात स्वतंत्र शाळा, मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांतून संस्कृत विषय घेऊन पहिला येणार्यास 1,000 ची शिष्यवृत्ती, असे अनेक उपक्रम राबवून श्रीमंत मुधोजीराजेंनी फलटण तालुक्यात आधुनिक शिक्षणाचा पायाच घातला. ते फलटण संस्थानच्या एकूण महसूली उत्पन्नापैकी 51 टक्के खर्च शिक्षण खात्यावर करीत असत. एवढा खर्च फक्त शिक्षणावर करणारे हे देशातील स्वातंत्र्यपूर्व काळातील एकमेव संस्थान होते. हेच काम पुढे श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सन 1917 पासून, म्हणजे ते संस्थानचे प्रमुख अधिपती झाल्यानंतर केले. याचा आपल्या पिढीला निश्चितच अभिमान आहे.
श्रीमंत मुधोजीराजे यांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाचा पाया घातला आणि श्रीमंत मालोजीराजे यांनी त्यावर फलटण तालुक्यात ग्रामीण भागातले पहिले मुधोजी महाविद्यालय आणि शेतीचे महत्त्व ओळखून कृषि विद्यालय उभारून कळसच उभा केला; असे यावेळी कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की; हा सर्व लोककल्याणाचा वसा आणि वारसा समर्थपणे आधी श्रीमंत शिवाजीराजे यांनी सांभाळला आणि आता तोच वारसा वसा म्हणून आ.श्रीमंत रामराजे पुढे जपत आहेत, वाढवित आहेत हे अभिनंदनीय आहे. रामराजेंचे कर्तृत्व मी तुम्हा फलटणकरांना सांगायला पाहिजे असे नाही. ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेच. पण आपल्या राज्यातील 87 दुष्काळी तालुक्यात पाणी देण्यासाठी, अभूतपूर्व असे महाराष्ट्र कृष्णाा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ तत्कालीन शासनाला स्थापन करायला लावण्यासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक प्रयत्नांची माहिती आम्ही नेहमी साहेबांकडून, पतंगरावांकडून ऐकत आलो आहोत. आमच्या भागातील टेंभू, ताकारी योजनांसाठी पतंगरावांना राजकारण विरहित सहकार्य करणारे अशी रामराजेंची ओळख आहे. त्यांच्यामुळेच या फलटण एज्युकेशन सोसायटीने सातारा जिल्ह्यातील पहिले कृषि, फलोत्पादन महाविद्यालय उभारले आहे. आमची इच्छा आहे की, लवकरच हे कृषि महाविद्यालय स्वायत्त असे स्वतंत्र कृषि विद्यापीठ व्हावे व श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजेंचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. यासाठी सध्याचे संस्थेचे तरुण चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे व संस्थेचे तरुण कार्यक्षम सचिव श्रीमंत संजीवराजेंचेही सहकार्य त्यांना लाभेल असा विश्वास वाटतो.
हा सर्व वैभवशाली इतिहास आणि वर्तमानकाळ लक्षात घेता आपल्याला शिक्षण, उच्च शिक्षण, संशोधन याबाबतही आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. या क्षेत्रातील काही नवी आव्हाने आपल्याला स्वीकारावी लागणार आहेत. अर्थात रामराजेंनाही याबाबतची कल्पना आहेच. कारण ते नुसते राजकारणी नाहीत तर पुढच्या पिढीला काय हवे यासाठी चिंतन करणारे, एक प्रयोगशील नेतेही आहेत; असे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.