

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२५ ) :-
दुष्काळपट्ट्यातील बाणगंगा नदीच्या काटाला वसलेले फलटण शहरात कायमच दुष्काळ होता. येणारे प्रत्येक परिस्थिती अत्यंत बिकट होत होती.यावेळी महाराष्ट्राच्या फलटण संस्थांचे अधिपतीपदी मालोजीराजे विराजमान झाले.यांनी जनकल्याणासाठी, रयतेसाठी आयुष्य खर्चले..असे मत श्री. नवनाथ रासकर यांनी व्यक्त केले. ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण,येथे मालोजीराजे जयंतीनिमित्त बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशालाचे प्राचार्य संजय वेदपाठक हे होते.मालोजीराजे यांचे प्राथमिक शिक्षण मधोजी हायस्कूल व तर राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याकडून त्यांनी प्रशासनाची धडे घेतले.मालोजीराजे यांनी आपल्या रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या संस्थानात सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी संस्थानात सहकारी पतपेढी व सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. १९१८ साली दि फलटण बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली, तसेच १९२६ साली श्री लक्ष्मी सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक स्थापन केली. सहकारी संस्थांमुळे संस्थानातील शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यांना पतपुरवठा होऊ लागला.भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातील आठ दक्षिणी संस्थानांचा गट बनवून संघराज्य स्थापन करण्यात मालोजीराजांनी पुढाकार घेतला होता; परंतु जनमत संघराज्य स्थापनेच्या विरोधी असल्यामुळे दक्षिणी संस्थानांच्या संघराज्याचा प्रयोग अयशस्वी झाला. ८ मार्च १९४८ ला कोल्हापूर संस्थान सोडून बाकी सर्व दक्षिणी संस्थाने मुंबई राज्यात विलीन करण्यात आली. फलटण संस्थान आपल्या खजिन्यातील पासष्ट लाख रुपये शिल्लक रकमेसह मुंबई राज्यात विलीन झाले.पुणे येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तत्पूर्वी प्रशालाचे प्राचार्य श्री संजय वेदपाठक प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय करून दिला . प्राध्यापिका मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री मारुती दिवसे यांनी आभार मानले.