जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनसातारा येथे राज्यपालांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 25 ): –

सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्यावी असे सांगून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी उपक्रमांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कौतूक केले. पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असेही निर्देश राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले.सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा घेत असताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास, बांबू लागवड, महिला सुरक्षा आदी सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 225 शाळांमध्ये गुणवत्ता आणि दर्जात्मक वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल या उपक्रमाची माहिती घेतली. या उपक्रमांतर्गत संगणक, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शौचालय, क्रीडांगण, स्वच्छ पाण्याची सुविधा आदी सर्व पायाभूत सुविधा दर्जेदार देण्यात आहेत. यामुळे काही दशकापासून घसरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारणार आहे. 2027 पर्यंत प्रत्येक गावात एक मॉडेल स्कूल करण्यात येणार आहे. याबाबत समाधान व्यक्त करुन अशा प्रकारच्या उपक्रमांबाबत आपण पहिल्यांदाच ऐकत असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अशा शब्दात त्यांनी या उपक्रमाबाबत कौतूक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जवळपास 13 टक्के कमी आहे. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरजही प्रतिपादित केली.जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक, धार्मिक, ऐतिहासीक व पर्यावरणपुरक पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असून यासाठी शासनाने 700 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रकल्पाबाबत माहिती घेत असतानाच साताऱ्यात जवळपास वर्षाला 15 लाख पर्यटक येतात यापैकी किती पर्यटक परदेशी असतात याची विचारणा केली. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, अशी सूचनाही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांना क्षेत्र महाबळेश्वर मंदीर विकास, किल्ले प्रतापगड संवर्धन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना जलपर्यटन, कोयना धरण बॅक वाटर स्पोर्ट प्रोजेक्टस आदी विषयांची माहिती देण्यात आली.जिल्ह्यात 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्राथमिक आरोग्य केंद्रे हा महत्वपूर्ण कणा असून त्यांच्या सक्षमीकरणावर व अद्ययावतीकरणावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत येत असल्याचेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सांगण्यात आले. यावर सातारा जिल्ह्याने या उपक्रमामध्ये घेतलेल्या पुढाकाराबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आदी सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करुन काम करत आहेत. याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे कौतूक केले.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बांबू लागवड, मॉडेल अंगणवाडी प्रकल्प, टसर सिल्क प्रकल्प, कार्य गुणवत्ता संनियंत्रण प्रणाली यासह जिल्हा वार्षिक आराखडा, जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती दिली.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतली विविध शिष्ट मंडळांची भेटराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सातारा येथील विश्रामगृहामध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांची भेट घेतली व त्यांची विविध विषयांवरील मते जाणून घेतली. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, औद्योगिक, पत्रकारीता, बांधकाम व्यावसायिक, बार असोसिएशन, कृषि आदी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेवून जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. यामध्ये मेडीकल कॉलेज पूर्ण क्षमतेने सूरु व्हावे, सिंचन योजना पूर्ण व्हाव्यात. जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, पुनर्वसनाचे प्रश्नन मार्गी लावावेत. जिल्ह्यात सैनिकांसाठी ट्रेनिंग सेंटर व्हावे. वडूज येथील हुताम्यांचे स्फूर्तीस्थान विकसित व्हावे, शहरातील पार्कींग प्रश्न मार्गी लावावा, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती व्हावी. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तहसीलदारांच्या डायसची उंची रद्द करावी. जिल्ह्यातील किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, कोल्हापूर खंडपीठ निर्मीती व्हावी. सेंद्रीय कृषि उत्पादन निर्यातीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!