विजयी भारतीय महिला संघ
उपकर्णधार सुरभी शर्माची हॅट्रिक
फलटण टुडे वृत्तसेवा (श्रीलंका (कोलंबो ), ०२ ऑक्टोबर, क्री. प्र.) : –
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु आहे. हि स्पर्धा मनीष किशोर यांच्या यु प्रो. या कंपनीने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशनच्या चार कोर्टचे नुतनीकरण करत एकत्रीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत तीस वर्षांवरील महिला गटात भारताने यजमान श्रीलंकेचा ५८-३९ असा १९ धावांनी मोठा पराभव केला. जागतिक इनडोअर क्रिकेटमध्ये भारताचा महिला संघ प्रथमच सहभागी झाला आहे. या विजयासह क्रीडा रसिकांना भारतीय महिला संघाने जागतिक स्तरावरील पहिल्या विजयाची भेट दिली. भारताने तगडा समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेवर १९ धावांनी विजय साजरा केला. प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारताने श्रीलंकेला ३९ धावांवर रोखत विजयाच्या दिशेने मोठे पाउल टाकले होते. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. आज क्षेत्ररक्षणात सुध्दा भारताने उत्कुष्ट कामगिरी केली. पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) भारताच्या कर्णधार दिशा पटेलने एका षटकात २ विकेट घेत श्रीलंकेच्या धावसंखेला पायबंध घातला, त्यामुळे श्रीलंकेच्या धावसंखेतून १० धावा वजा होऊ शकल्या (प्रत्येक विकेटसाठी ५ धावा केल्या जातात). त्यावेळी श्रीलंकेच्या नदीका प्रेमासिरी (4 धावा ३ विकेट) व कुमुदू जयासुन्दरा (६ धावा) यांनी १० धावा धावफलकावर लावल्या. दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) भारताने ३ विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. भारताच्या विशलक्षि प्रकाशने २ तर रेश्मा शेट्टीने १ विकेट घेतला. या चार षटकात श्रीलंकेच्या शशिकाल डीसिल्वा (१० धावा) व शानिका विजेसेकरा (२ धावा) केल्या व धावफलकावर १२ धावा लावल्या. तिसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) भारताने ४ विकेट घेत श्रीलंकेच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले. भारताच्या कस्तुरी कोलतेने ३ तर विशलक्षि प्रकाशने १ विकेट घेतला. या चार षटकात श्रीलंकेच्या हर्शानी फर्नान्डो (१३ धावा १ विकेट) व अनुशिका अंथोनी (वजा ३ धावा) यांनी धावफलकावर १० धावा लावल्या.शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) भारताने ५ विकेट घेत श्रीलंकेची मोठी धावसंख्या उभारण्यावर लगाम घातला. भारताच्या दिशा पटेलने व अरीत्री मित्राने प्रत्येकी १ विकेट घेतला तर उपकर्णधार सुरभी शर्माने हॅट्रिकसह ३ बळी घेतले. हॅट्रिक मिळवणारी सुरभी भारताची पहिली खेळाडू ठरली. भारताने फलंदाजी करताना पहिल्या चार षटकांत अरीत्री मित्रा (११ धावा व १ विकेट) व कस्तुरी कोलते (८ धावा व ३ विकेट) या पहिल्या जोडीने १९ धावा धावफलकावर लावल्या. दुसऱ्या चार षटकांत उपकर्णधार सुरभी शर्मा (६ धावा व ३ विकेट) व ज्योथी चंद्रशेकर (वजा २ धावा) यांनी ४ धावांची भर घातली. तिसऱ्या चार षटकात दिशा पटेल (१२ धावा व ३ विकेट) व रेश्मा शेट्टी (८ धावा व १ विकेट) यांनी २० धावांची भर घालत भारताला मजबूत स्थिती मिळवून दिली. तर चौथ्या व शेवटच्या जोडीने भाताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना पूजा जैन (१ धाव) व विशलक्षि प्रकाश (१४ धावा व २ विकेट) यांनी १५ धावा केल्या.
सामन्यातील काही क्षणचित्रे :-