विद्या प्रतिष्ठान
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
16 ऑक्टोबर, विद्या प्रतिष्ठान संस्थेचा 52 वा वर्धापनदिन होत असताना अनेक विद्यार्थी घडविले जात आहेत व जगाच्या कानाकोपऱ्यात हे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रा.व्यंकटेश रामपूरकर (सहायक प्राध्यापक, संगणक विभाग, विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय, बारामती ) यांनी सांगितले.वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते याप्रसंगी सर्व आजी-माजी विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते.एखादी संस्था जेव्हा मोठी होते तेव्हा साहजिकच मागे वळून पाहताना या संस्थेचा प्रवास किती खडतर असतो आणि किती दिव्यातून संस्थेला जावे लागते याचे स्मरण होते. ज्येष्ठ नेते व मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांनी बारामतीत इंग्रजी माध्यमाची शाळा असावी या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदीर शाळेची स्थापना केली आणि तेथून ख-या अर्थाने या संस्थेचा प्रवास सुरु झाला. पुढे अजितदादा पवार यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर विद्यानगरीतील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलाचा विस्तार अधिकच वाढत गेला. काळाची पावले ओळखून पवारसाहेबांनी अनेक नवीन निर्णय घेतले. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर देखणं असून चालणार नाही, शिक्षणाचा दर्जा अत्युत्तम हवा हा त्यांचा आग्रह. प्रत्येक मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा प्राध्यापक व शिक्षकांना दिलेले मुक्त स्वातंत्र्य व शैक्षणिक कामात कसलाही हस्तक्षेप न करता संस्थेच्या सर्वांगिण वाढीसाठी मागे राहून प्रोत्साहन देण्याची पवार कुटुंबियांची भूमिका कौतुकास्पद आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते हे याचे वेगळेपण म्हणावे लागेल. नर्सरी ते पीजी असे शिक्षण देताना विधीपासून आयटी पर्यंत आणी इंजिनिअरिंग ते आर्किटेक्चरपर्यंत शिक्षणाची दालने खुली करणारी ही संस्था बारामतीच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारी आहे. अनेक विद्यार्थ्यांसोबत एक पिढी घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. विद्या प्रतिष्ठानमधून शिकून सवरुन मोठी झालेली व जीवनाच्या अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले हजारो विद्यार्थी या संस्थेचा नावलौकीक मोठा करताना दिसतात. अनेक विद्यार्थी परदेशात नामांकित कंपन्या मध्ये मोठ्या हुद्यावर काम करताना दिसतात. या संस्थेसाठी झटणारी असंख्य माणसं आहेत, ज्यांच्या कष्टामुळे ही संस्था नावारुपाला आली आहे. संस्थेसाठी योगदान देणारे स्व. विनोदकुमार गुजर, स्व. डॉ. एम.आर.शहा, स्व. अप्पासाहेब जाधव, स्व. हरिभाऊ देशपांडे, स्व. खुशालभाऊ छाजेड यांची आज प्रकर्षाने आठवण होते. पवारसाहेबांचे जिवाभावाचे हे सहकारी. चांगला विद्यार्थी पर्यायाने या देशाचा एक सक्षम नागरिक संस्थेतून घडला पाहिजे, याचीच काळजी या सर्वांनी घेतली. विद्यमान विश्वस्तांपैकी अँड. ए.व्ही. प्रभुणे, सौ.सुनेत्रावहिनी पवार, श्री युगेंद्रदादा पवार, अँड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा,श्री किरण गुजर, श्री विठ्ठल मणीयार, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कुंभोज व डॉ. राजनकुमार बिचकर सर यांचे अमूल्य योगदान या संस्थेच्या वाटचालीत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सौ. सुनेत्रावहिनी पवार, व सौ. सुप्रियाताई सुळे यांचेही अत्यंत बारकाईने संस्थेकडे लक्ष असते. शैक्षणिक हब म्हणून बारामतीची आज ओळख आहे, त्यात विद्या प्रतिष्ठानचे महत्व अनन्यासाधारण असेच आहे. या संस्थेच्या शाळा व महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा, अद्यावत प्रयोगशाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या जागतिक दर्जाच्या रोबोटीक व ऑटोमेशन सेंटर च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी चांगले ज्ञान आणि अद्यावत कौशल्य आत्मसात करून औदयोगिक क्षेत्राच्या स्पर्धेत अव्वल ठरत आहेत. या संस्थेमध्ये येत्या काही काळातच सुरु होणारे आर्टिफिसिअल इंटेलिजन्स चे सेंटर ही एक नवी पर्वणीच आपल्या समस्थ बारामतीकरांसाठी असेल.या संस्थेचा वटवृक्ष होताना त्या संस्थेसाठी तन,मन धनाने योगदान देणा-या प्रत्येकाविषयी कृतज्ञता आहेच परंतु प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत आहे हे सुद्धा फार महत्त्वाचे असल्याचे प्रा. व्यंकटेश रामपूरकर यांनी सांगितले.फोटो ओ