लोकांनी भरभरुन मते दिली त्या सर्वांचे आभार : दिपकराव चव्हाण
फलटण टुडे (फलटण दि.३० ): –
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षात आपण जिरायत पट्टा बागायत करण्यासह विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे श्रेय घेण्यात मागे राहिल्याने ३० वर्षानंतर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले, आगामी काळात त्यामध्ये सुधारणा करुन आपण यशस्वी होऊ, तथापि कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करुया असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राजे गट पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर बोलत होते, अध्यक्षस्थानी माजी आमदार दिपकराव चव्हाण होते, यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, कोरेगावचे माजी उपसभापती संजय साळुंखे, विकास साळुंखे, वसंतराव गायकवाड, दिलीपराव अहिरेकर, सुखदेव बेलदार-पाटील, श्रीरामचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हा.चेअरमन नितीन शाहुराजे भोसले, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, नागेशशेठ जाधव, बाळासाहेब भोईटे, माजी सभापती सौ.रेश्मा भोसले, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, शंभूराज खलाटे, प्रा.अनिल जगताप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन आणि शेतकरी, ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संपूर्ण मतदार संघात मतदान आकडेवारी पाहता लोकांनी भरभरुन मतदान केले आहे, झालेल्या एकूण मतदानांपैकी आपल्याला ४३ टक्के मते मिळाली असल्याने हा पराभव स्वीकारुन कोणालाही दोष न देता, पूर्वीप्रमाणे एकविचाराने आपली वाटचाल सुरु ठेवून आगामी काळात विकास प्रक्रिया पुन्हा गतिमान करुन लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहुयात असे आवाहन करताना आपले सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन उत्तम काम केले त्यांचे आभार अध्यक्षीय भाषणात दिपकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लोकांनी आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्यानेच आपण एवढी मते घेऊ शकलो तथापि आपण केलेली विकास कामे लोकांसमोर ठेवण्यात आणि खोटे बोल पण रेटून बोल या न्यायाने आपल्यावर विरोधकांनी केलेले खोटे नाटे आरोपांचे खंडन करण्यात आपण कमी पडल्याने त्यांची दिशाभूल करुन विरोधकांनी मते घेतल्याने आपला पराभव झाला असला तरी तो आपला विजय आहे, आगामी काळात लोकांसमोर जाऊन वस्तुस्थिती त्यांना समजावून देऊन आपण लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करुन यशस्वी होऊ याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
प्रारंभी डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात संवाद मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी प्रा.अनिल जगताप, शंभूराज खलाटे, संजय साळुंखे, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वगैरेंची भाषणे झाली. धनंजय पवार यांनी समारोप व आभार मानले.