ऑस्ट्रेलियाचा आदर्श भारतानेही घ्यावा….

फलटण टुडे (फलटण दि ०२):-

रिल्स, स्टोरीज, डी.पी., स्टेटस् या सोशलमिडीयावरील अतिलाडक्या शब्दांचा वापर आपण सर्रास अनेकांच्या तोंडून ऐकत असतो. सोशलमिडीयामध्ये तासन्तास गुंतून राहणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती असतात. खरं तर इंटरनेटच्या विस्तारामुळे जग जवळ आले आहे असे आपण म्हणतो. सोशल मिडीयाचा विस्तार झाल्यापासून जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून आपल्या प्रियजनांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे; हे ही खरे आहे. इंटरनेट आणि सोशलमिडीयामुळे जसा संपर्क सोपा झाला आहे तसं वेगवेगळ्या प्रकारच्या, घडामोडींच्या माहितीचं विस्तारीत दालनही यानिमित्ताने प्रत्येकासाठी खुलं झालं आहे; हे देखील नाकारता येणार नाही. माहिती व तंत्रज्ञानाच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर चालणारे ‘सोशलमिडीया’ हे खणखणीत नाणे बनले आहे. या सोशल मिडीयाच्या एक ना अनेक या जमेच्या बाजू असल्या तरी नाण्याच्या दुसर्‍या बाजूला अनेक धोकेही अगदी गडद स्वरुपात आहेत.

या धोक्यांपैकी एक मोठा धोका म्हणजे वाढते नैराश्य. सोशल मिडीयाच्या अतिवापराचा हा दुष्परिणाम अल्पवयीन मुलांसाठी गंभीर असून हीच बाब लक्षात घेवून ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारकडून विधेयक मंजूर करण्यात आले असून मुलांना सोशल मीडिया बंदी करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला आहे. या देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा कायदा पारित केला आहे. या नव्या कायद्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुकसह टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांना लॉग इन करता येणार नाही. जर कोणी लॉग इन केलं तर त्यांना 32 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 2,70,36,59,000 रुपयांना दंड ठोठवला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. हा कायदा लागू करण्याच्या प्रक्रियेचं परीक्षण जानेवारी महिन्यात सुरू होईल आणि पुढील एका वर्षात बंदी लागू होईल; असेही सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावरील नकारात्मकतेमुळे लहान मुलांचं मानसिक स्वास्थ बिघडत आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. शाळेतील शैक्षणिक अभ्यासासाठी युट्यूबचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो त्यामुळे या कायद्यातून युट्यूब वगळण्यात आलं असल्याचेही समजत आहे. हा कायदा करताना ऑस्ट्रेलियन सरकारकडून ‘मुलांच्यात वाढती नकारात्मकता’ हे जे कारण पुढे करण्यात आले आहे त्याला संशोधनाचा निश्‍चित आधार आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराने मानसिकतेवर कोणता परिणाम होतो यावर जगभरात विविध ठिकाणाहून संशोधन झालेले आहे. यामध्ये सोशल मिडीया आणि नैराश्य याचा परस्पर संबंध अधोरेखित झाला असून सोशल मिडीयाचा अतिवापर नैराश्याच्या विकासाशी मोठ्या प्रमाणात संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले जर सोशलमिडीयामध्ये अधिक व्यस्त राहीली तर त्यांच्यामध्ये नैराश्य वाढून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता तीव्र आहे. अल्पवयीन वर्ग जर अशा नैराश्याच्या छायेत मोठ्या संख्येने अडकला तर ही खूप मोठी धोक्याची घंटा असेल त्यामुळे एकूणच काय तर ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानेच हे कडक पाऊल उचलले आहे; हे या कायद्यामागचे स्वच्छ वास्तव मानायला हरकत नाही.

सोशलमिडीयाची क्रेझ जेव्हा वाढली तेव्हा विशेषत: युवावर्ग याकडे आकर्षिला गेला. नव्या जगाचे तंत्रज्ञान वापराची माहिती आपल्याला असणे आजच्या युगात क्रमप्राप्त असले तरीही त्याच्या वापरावर मर्यादा ही असायलाच हवी. या सोशलमिडीयाच्या अतिवापराच्या दुष्परिणामाचे अगदी बेसिक उदाहरण द्यायचे झाल्यास ते असे की, एखाद्या सोशल साईटवर आपण अपलोड केलेल्या फोटोला किती लाईक्स मिळाले? त्यावर कोणी काय कमेंट केली? आपल्याला इतरांच्या तुलनेत कमी लाईक्स का मिळतायतं? आपण इतरांसारखं छान दिसत नाही कां? आपले फोटो चांगले येत नाहीत कां? अशा प्रकारच्या विचारातून तरुणांमध्ये नैराश्य वाढीस लागताना दिसून येते. तसेच इतरांशी तुलना करण्याचे प्रमाण वाढीस लागून स्वत:ला कमी समजले जाते. याचबरोबर सोशलमिडीयावर तासन्तास गुंतून राहिल्याने परस्पर संवाद संपतो. मोबाईल हेच विश्व बनते आणि एकप्रकारे स्वच्छंदी आयुष्य जगायचेच राहून जाते. त्यातून एकटेपणा, चिडचिड वाढीस लागते. आत्मविश्‍वास कमी होतो. यासर्वातून ताणतणाव वाढून कमी वयात गंभीर आजारही जडण्याची शक्यता राहते. रात्री उशिरापर्यंत सोशलमिडीयावर व्यस्त राहिल्याने झोप कमी होते. अभ्यास, शिक्षण याकडे दुर्लक्ष होवून करिअरही धोक्यात येते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना अशा धोक्यांपासून वेळीच दूर ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने सोशल मिडीया वापरावर आणलेले निर्बंध संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहेत.

शेवटचा मुद्दा :
आज अनेक पालक आपल्या पाल्यांना मोठ्या कौतुकाने मोबाईल देतात. आजची मुले अगदी बालवयातच मोबाईल मोठ्या कौशल्याने हाताळतात आणि पालकांनाही त्याचं मोठं कौतुक वाटतं. मुले त्रास द्यायला लागली की त्यांच्या हातात मोबाईल द्यायचा आणि मग ते मुलं शांतपणे यु-ट्यूबवर काही तरी बघत शांत बसतं हे चित्र सर्रास घरोघरी दिसायला लागलं आहे. यातून बालकांमध्ये मोबाईलचे आकर्षण वाढून सोशलमिडीयाच्या धोक्यांकडे पालकचं त्यांना कळत – नकळत ढकलत आहेत. त्यामुळे आपली उद्याची पिढी सुरक्षित, सक्षम आणि बलवान राहण्यासाठी प्रत्येकाने ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयाचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भारत सरकारनेही देशाच्या भवितव्याचा विचार करुन ऑस्ट्रेलियाचा आदर्श घेवून त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकणे अत्यावश्यक आहे.

रोहित वाकडे,
संपादक, लोकजागर.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!