नर्मदा आजी व हरीश कुंभरकर
फलटण टुडे (वाचन कोपरा) बारामती:-
आजच्या आत्याधुनिक तंत्रज्ञांच्या युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व ग्रामीण ची शहरा कडे वाटचाल होत असल्याने आणि पती पत्नी नोकरी करत असल्याने प्रेम,संस्कार देण्यासाठी प्रत्येक घरात ‘आजी’ पाहिजे असे प्रतिपादन कवी, लेखक ऍड हरीश कुंभरकर यांनी सांगितले.
नर्मदा आजी या आपल्या आजीच्या आठवणी वर आधारित पुस्तक लेखन चा प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्तीत होते.
मला भल्या सकाळी तिच्या पुढ्यात घेऊन एका गालावर चार बोटं व दुसऱ्या गालावर अंगठा दाबून आजी माझं चंचल डोकं काबुत ठेवायची, मग माझ्या केसांचा तिच्या काळपटलेल्या फनीने भांग पाडायची. माझ्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूने माथ्याच्या दिशेने, चपचप तेल लावलेल्या केसांच्या मधून तो भांग म्हणजे डोक्यात एक सरळ रेघ ओढल्यासारखी दिसायचा . त्यावेळी आजीनं दाबुन फिरवलेल्या कंगव्यानं माझ्या केसांना जी दिशा दिली तीच माझी हेअरस्टाईल होय, तो केसांचा भांग व आकार ही आजी ची देण आहे , आजीच्या त्या कलाकृतीला छेडछाड न करता आजतागायत मी स्विकारलेय त्याचा मान ठेवलाय.
तो गावरान मेक-अप झाल्यावर तीच्या हातांतुन चेहरा सोडण्यापुर्वी ती माझ्या कपाळावर ओठ टेकवुन दोघांना ऐकु ऐईल असा “पिच्चच् ….” आवाज काढायची.. ते चुंबन , त्यावेळीचं तिचं ते प्रेम कळण्याइतकं माझं वय नव्हतं, पण खूप आधार वाटायचा, हळुच कुशीत शिरायला ती मला अगदी जवळची जागा वाटायची..
संध्याकाळीचा स्वयंपाक झाला की पितळाच्या तांब्यात दुध भरून आजी चुलीतल्या तेवत्या विस्तव्यावर रात्रभर ठेवायची, मध्यरात्री लागलेली भुक क्षमवण्याची तीने क्लुप्ती शोधली व आजीनं तांब्याभर दुध प्यायची लावलेली ती सवय आजही माझा दैनंदिन नित्यक्रम आहे, हा आजीनं दिलेला वारसा अर्ध्यावयात पण मला सोबत देतोय.
हिरव्या व नारंगी गडद रंगाच्या साडीत आयुष्याचा मोठा काळ जगलेली माझी आजी अधुनमधुन नकळत … आजपण डोळ्यांसमोर मृगजळा सारखी तरळते, इयत्ता सहावी पर्यंत मी तिच्या सोबत उजव्या हाताची उशी करून झोपत असे, पक्षाने त्याच्या पिलाला अलगद पंखाखाली जपून अनं लपवून ठेवावं अगदी तसंच तिच्या त्या सुती साडीच्या पदराच्या आश्रयाला ती मला झाकुन घेतं, त्या पदराचा गारवा ह्या चेह-याला दुर्दैवांने पुन्हा कधीच उपभोगायला नाही लाभला..
नर्मदा आजीच्या आपुलकीच्या ओलाव्यात तिच्या तिरावर , तिच्या निगराणीत व सहवासात आम्ही सर्व नातवंडं कळीत वयाची झालो , ऐंशीच्या वयात पण तिच्या तोंडातले सगळे दात बटव्यातले चिंचोके कडाकड फोडत , आधाराला कुणाची कसलीच गरज नव्हती , कॅरमच्या हंटरच्या आकाराऐवढं कुंक ती आरश्यात पाहुन अगदी गोलाकार लावत , चहा पिताना नाकातली नथही बशीत डोकावत असे , काळ्या मन्यांचे गळ्यातलं डोरलं कायम पदराआडून डोकवायचं , घरातल्या अनेकांनी तिचा पदर डोक्याखाली घसरलेला कधी पाहिला नाही . चेहरा व हिरव्या , जांभूळ्या चोळी बाहेरची उघडी सुरकुतलेली त्वचा तीच्या वयस्क असण्याचा पुरावा होता , बाकी सगळं शरीर खाणदाणी पद्धतीने सावरून असायचे . हातातल्या आर्धा – अर्धा डझन काचेच्या बांगड्यांचा आवाज आजी कामात व्यस्त आहे हे आवाज करून सांगायच्या .
आजीचा एक गुडगा काखेत दाबुन, दुस-या पायाची मांडी जमिनीवर लोळण घेतं, ती सतत कामात अनं संसारात अखंड बुडलेली असायची, सकाळी कोवळ्या उन्हात बसुन वेणी-फणी करणे, चुलीसमोर मिश्री, मकेची कणसं, चिंचोके, बोंबील भाजणे व दुधावर भाकरीच्या जाडीची पिवळसर साय येईपर्यंत पातेल्याची राखण करणं हा तिचा नित्यक्रम आवडता छंद वाटायचा. तिच्या मालकीचा कमरेचा बटवा अंघोळ करतानाच फक्त आराम करायचा, अन्यथा तो बटवा कायम आजीच्या सेवेत तत्पर असायचा.
मुला-बाळांना शेलकं खायला घालण्यावर तिचा भर होता, अतिशय स्वच्छ अनं नीटनेटकं रहाणारी, एकदम सडेतोड उत्तर देणारी, हजरजबाबी व्यक्तिमत्त्व, व्यवहारी स्वभाव, प्रपंचिक कारभारीन अशी तिची ओळख असायची.
दोन पाकी पत्र्याच्या घरात एका कोप-यात तिची हक्काची मातीच्या मडक्यांची उतरंड, कुठल्या मडक्यात कुठल्या बिया-बियाणे व वस्तु हे तीला तोंडपाठ असायचे, त्याच्याच शेजारी तिची स्वमालकीची खाजगी मोठी लोखंडी ट्रंक दिमाखात ठाण मांडुन असायची, तिच्या मडक्यांच्या उतरंडीला व ट्रंकला कुणी उचका-पाचक केली तर कुणास ठाऊक तिला पक्का मॅसेज किंवा नोटिफिकेशन मिळे इतकी ती दक्ष असायची..
आजीनं उभा केलेला काटकसरीचा संसार, तिनं घडवलेला गोतावळा, तिनं केलेले संस्कार, अहोरात्र उपसलेले कष्ट आम्ही पाहात गेलो, तो वारसा पुढे चालत राहिला. परिवर्तन होत गेलं व परिस्थिती सुधारत गेली.. पुर्वजांची पुण्याई कामी येत आहे याचं आम्हांला सर्वांना नेहमीच भान होतंय तीच आपली खरी ताकद हे स्मरण रहातं ….
कपाळाचे चुंबन घेणारी आजी, केसांना तेल लावून भांग पाडणारी आजी, हाताची बोटे कडाडून मोडुन मीठ मिरचीची दृष्ट काढणारी आजी, वाळलेल्या चपाती-भाकरीचा साखर घालुन मलिदा खायला देणारी आजी, ऊसाची कांडी सोलुन देणारी आजी, गरम हुरडा- हरभरा भाजुन हातावर चोळणारी आजी आताही अगदी स्पष्ट आठवते, मनात हुबेहूब अवतरते .
मी तिला माझ्या अल्लड, चंचल, अविचारी वयात कितीदा तरी दुखावले होते. आमच्या व्यापल्या अंतरानं माझे त्यावेळी अनेक शब्द चुकले हे मान्य केलं . आज मात्र ती हयात नाही हे पचत नाही.
आमच्या घरात #आजी माझ्या वाट्याला सगळ्यात जास्त आली हे माझं भाग्य. माणसं आयुष्यात असतात तोवर आपल्याला किंमत कळत नाही अनं सोडुन गेल्यावर फक्त आठवतात ते त्यांसोबत जगलेले क्षण. तिची आठवण मला खूपदा भावनिक करते आणि अंतर्मुख होऊन दमवते. या घडीला आपण #नर्मदेचे वारसदार आहोत याचं आत्मीक समाधान कायमचं बळ देणारं ठरतंय
असेही हरीश कुंभरकर यांनी सांगितले.