फलटण टुडे (सातारा दि. 3 ):-
समाजातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना राबविण्यात येते. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.
किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्य असलेल्या वधु किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधु किंवा वराशी विवाह केल्यास सदर दांपत्यांस या योजनेचा लाभ देण्यात येतो.
अर्थ सहाय्याचे प्रदान पुढीलप्रमाणे – रक्कम रुपये 25000/- चे बचत प्रमाणपत्र, रुपये 20000/- रोख स्वरुपात, रुपये 4500/-संसार उपयोगी साहित्य/वस्तु खरेदीसाठी देण्यात येईल, रुपये 500/- स्वागत सभारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
विवाह नोंदणी दाखला, वर/वधु यांचा शाळा सोडल्याचे दाखले, वर अथवा वधुचे दिव्यांगत्वचे प्रमाणपत्र, वर व वधुचे लग्नाचे एकत्रित फोटो, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारस पत्रे, महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयात येथे संपर्क करावा.