*जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन*
फलटण टुडे (सातारा दि.5 ) :-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या सहकार्याने जिल्हास्तर युवा महोत्सव २०२४ चे आयोजन दिनांक ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले.
जिल्हास्तर युवा महोत्सव उद्घाटन प्रसंगी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा चे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, नेहरू युवा केंद्र, सातारचे स्वप्नील देशमुख व कला व क्रीडा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष, आर. एस. पी. सुनील जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून व वंदन करून संपन्न झाले. कार्याक्रमचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मनिषा पाटील, डीन, विद्यार्थी विकास मंडळ यांनी केले. यावेळी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तसेच लगान फेम अभिनेता अमीन हाजी उपस्थित होते.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपराचे जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे याकरीता दर वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन खेळ व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा करण्यात येते. या वर्षी “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” ही संकल्पना खेळ व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेली होती. या संकल्पानेवर आधारित स्पर्धेत जवळपास २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सदर युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारित स्पर्धा (विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना), सांस्कृतिक (सामुहीक लोकनृत्य, लोकगीत), कौशल्य विकास (कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता), युथ आयकॉन, या प्रकारांमध्ये स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. तसेच विजेत्या स्पर्धकांचे ६ डिसेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या नियोजांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी, स्नेहल शेळके व रवि पाटील, तसेच नेहरू युवा केंद्रचे भानुदास यादव तसेच प्रतिभा यादव, उपशिक्षिका आदर्श विद्यामंदिर कारंजे पेठ, सातारा यांचे मोलाचे योगदान लाभले.